लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई: अमेरिकेची बाजार नियंत्रक असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (एसईसी) कथित फसवणूक आणि २६५ दशलक्ष डॉलरच्या लाचखोरीच्या प्रकरणात गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांना समन्स बजावण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे. या वृत्तांमुळे शुक्रवारच्या सत्रात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या समभागांत १३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
अमेरिकी गुंतवणूकदारांकडून पैसे उभारणाऱ्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडशी निगडित हे प्रकरण आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये ‘एसईसी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात मुख्यत्वे लाचखोरी आणि फसवणूक असा ठपका अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. निधी उभारणी करताना खोटे आणि दिशाभूल करणारे विधान गौतम अदानी आणि सागर अदानी यांनी केले आणि हा अमेरिकेच्या नियामक कायद्यांचे उल्लंघन असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अदानी समूहाने मात्र अमेरिकेच्या न्याय विभाग आणि एसईसीने अदानी ग्रीनच्या संचालकांवर केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. भारताच्या सौर ऊर्जा महामंडळाकडून मोठी कंत्राटे मिळविण्यासासाठी लाच दिल्याचा आरोपही फेटाळला आहे.
दरम्यान, अमेरिकी नियामक मंडळाने न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन येथील न्यायालयात, समन्स बजावण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांकडून मदत मिळवण्यात त्यांना अपयश आल्याचे सांगितले. भारत सरकारने समन्स बजावण्याच्या दोन विनंत्या यापूर्वी नाकाल्याचे एसईसीने सांगितले. त्यानंतर नियामक मंडळाने अदानी यांना ईमेलद्वारे नोटिसा बजावण्याची परवानगी मागितली आहे.
समभागांत पडझड
अदानींवर चौकशी सावट निर्माण झाल्यानंतर समूहाच्या कंपन्यांच्या समभागांत १३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. अदानी एंटरप्रायझेसला सर्वाधिक फटका बसला. कंपनीचा शेअर १०.६५ टक्क्यांनी म्हणजेच २२२ रुपयांनी घसरून १,८६४.२० रुपयांवर बंद झाला. कमकुवत तिमाही निकाल आणि नियामक घडामोडींमुळे समूहाच्या इतर कंपन्यांच्या समभागांनाही झळ बसली.
