Marco Rubio Taj Mahal visit Agra: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मार्को यांनी सोमवारी (२५ मे) पत्नी जीनॅट डी. रुबियो यांच्यासह आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. रुबियो दाम्पत्याच्या ताजमहाल भेटीवरुन इराणने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या महावाणिज्य दूतावासाने, “रुबियो यांना ताजमहालचा इतिहासच सांगत रुबियो यांना हा इतिहास ज्ञात असता तर त्यांनी इथं फोटोच काढला नसता. तसेच, त्यांचे सरकार इराणी संस्कृती नष्ट करण्याची धमकी देत आहे”, असा हल्लाबोल इराणने केला.

रुबियो दाम्पत्याची ताजमहालला भेट

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी पत्नी जीनॅट डी. रुबियो यांच्यासह आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. यावेळी त्यांच्याबरोबर भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर देखील उपस्थित होते. मार्को यांनी पत्नी जीनॅटसह ताजमहालसमोर फोटोसाठी पोझ दिली. यानंतर गोर यांनी देखील रुबियो दाम्पत्यासह फोटो काढला. यानंतर इराणने रुबियो आणि पर्यायाने अमेरिकेवर खोचक टीका केली.

इराणकडून टीका

“रुबियो यांना इथला इतिहास किंवा वास्तुकला माहीत असती, तर त्यांनी इथं फोटोसाठी पोझ दिली नसती. हे स्मारक सम्राटाच्या इराणी पत्नीच्या प्रेमापोटी उभारले गेले होते, इराणी वास्तुविशारदांच्या प्रतिभेने ते साकारण्यात आले होते. दुसरीकडे, आज त्यांचे सरकार इतर संस्कृतींचा अपमान करून इराणी संस्कृती नष्ट करण्याची धमकी देत ​​आहे”, अशा टीकेची पोस्ट इराणच्या हैद्राबाद येथील महावाणिज्य दूतावासाने एक्सवरुन शेअर केली आहे.

रुबियो यांचा भारत दौरा

मार्को रुबियो चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, या दौऱ्याची सांगता उद्या दिल्लीत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीने होणार आहे. यापूर्वी रुबियो यांनी आज सकाळी आग्रा येथील ताजमहालला भेट दिली. त्यानंतर त्यांनी जयपूर येथील अंबर किल्ल्याला भेट दिली.

दिल्लीत अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन साजरा

रुबियो यांनी दिल्लीत आयोजित अमेरिकेच्या अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्यदिनाला हजेरी लावली. यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर देखील उपस्थित होते. रुबियो यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली.

शांतता करारावर भाष्य

“एक अतिशय ठोस प्रस्ताव आहे, या माध्यमातून सामुद्रधुनी खुली करण्यासह आणि अणुविषयक बाबींवर महत्त्वपूर्ण वाटाघाटी होऊ शकतील. डोनाल्ड ट्रम्प कोणताही डळमळीत करार करणार नाहीत असा विश्वास आहे. सकारात्मक पद्धतीने चर्चा पुढे जात आहे”, असे इराणबरोबर सुरु असलेल्या शांतता चर्चेवर रुबियो यांनी भाष्य केले.