एपी, तैपेई (तैवान)
चीनच्या कथित हेरगिरी करणाऱ्या ‘बलून’ने अमेरिकेच्या हवाई हद्दीचा भंग करून अमेरिकेच्या लष्करी तळांवर पाळत ठेवली, असा संशय अमेरिकेला आहे. त्यामुळे चीन-अमेरिकेतील राजकीय संबंधांत तणाव निर्माण झाला आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी चीन दौरा रद्द केला आहे.
या ‘बलून’संबंधित घटनाक्रमांमुळे ब्लिंकन यांनी चीन दौरा स्थगितीच्या निर्णयाला चीनने फारसे महत्त्व दिले नाही. या दौऱ्याची कोणतीही अधिकृत घोषणा उभय पक्षांनी केली नसल्याचा दावा चीनने केला.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सकाळी एका निवेदनात नमूद केले, की खरे तर अमेरिका व चीनने कधीही भेटीची घोषणा केलेली नाही. दौरा रद्द करण्याची अशी कोणतीही घोषणा करणे, ही अमेरिकेची बाब आहे व आम्ही त्याचा आदर करतो.
अमेरिका-चीन तणाव कमी करण्याच्या उद्देशाने ब्लिंकन रविवारी चीनचा दौरा करणार होते. गेल्या नोव्हेंबरमध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांची इंडोनेशियामध्ये भेट झाल्यानंतरची ही पहिलीच उच्चस्तरीय राजकीय नेत्याची चीन भेट ठरणार होती. परंतु चिनी ‘बलून’ आढळल्यानंतर अमेरिकेने ब्लिंकन यांचा दौरा अचानक रद्द केला.
चीनच्या दाव्यानुसार हा केवळ हवामान संशोधनासाठी वापरले जाणारे ‘बलून’ असून, ते भरकटले आहे. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटेगॉन’ने हे ‘बलून’ हवामान संशोधनाशी संबंधित असल्याचा चीनचा दावा फेटाळला आहे. या ‘बलून’चा वापर अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांवर पाळत ठेवण्यासाठी होत नाही व त्याच्याकडे मर्यादित वहनक्षमता असल्याच्या चीनच्या दाव्यावर अमेरिकेचा विश्वास नाही.
अमेरिका या ‘बलून’विषयी उगाच वाजवीपेक्षा जास्त अपप्रचार करत आहे. वास्तव तसे नाही, अशी टीका ताईहे संस्थेतील चीनचे लष्करी विशेषज्ञ चेन हाओयांग यांनी राष्ट्रीय वाहिनी ‘फीनिक्स टीव्ही’वर बोलताना केली आहे. ते म्हणाले, की अमेरिकन लष्करी धोक्याच्या तुलनेत हा धोका खूपच कमी आहे? त्यांची पाळत ठेवणारी विमाने, त्यांच्या पाणबुडय़ा, त्यांची नौदलाची जहाजे चीनच्या सीमेजवळ वावरत आहेत.
बलून न पाडण्याचा निर्णय
संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा ‘बलून’ मोंटाना येथील माल्मस्ट्रॉम हवाई तळावरील हवाई हद्दीत दिसला होता. येथे अमेरिकेच्या तीन आण्विक क्षेपणास्त्र स्थळांपैकी एक स्थळ आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ‘बलून’ न पाडण्याचा निर्णय घेतला होता. हे ‘बलून’ पाडण्यास संरक्षण अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. कारण त्याच्या ढिगाऱ्याखाली नागरिक जखमी होण्याची भीती होती.