वॉशिंग्टन : भारत व अमेरिका यांच्यात इतर बाबींपेक्षा मानवाधिकार व लोकशाही यांच्या संबंधांत अनेक मूल्ये समान आहेत. त्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन हे त्यांच्या पहिल्या भारत भेटीत भारतीय अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत हे मुद्दे उपस्थित करणार आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने दिली.

ठरलेल्या कार्यक्रमानुसार, ब्लिंकन हे २७ जुलैला उशिरा नवी दिल्लीत येणार आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांना भेटतील. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेही ब्लिंकन यांना भेटणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी दिल्लीत सांगितले.

‘मानवाधिकार व लोकशाही यांच्या संदर्भात सांगायचे, तर आम्ही ते मुद्दे उपस्थित करणार आहोत आणि आम्ही ते संभाषण सुरू ठेवू. कारण, इतर बाबींपेक्षा मानवाधिकार व लोकशाही यांच्या संबंधांत भारत व अमेरिका यांच्यात अनेक मूल्ये समान आहेत, यावर आमचा ठाम विश्वास आहे’, असे दक्षिण व मध्य आशिया व्यवहारविषयक प्रभारी सहायक परराष्ट्रमंत्री डीन थॉम्पसन यांनी ब्लिंकन यांच्या भेटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

भारतात नागरी स्वातंत्र्याचा संकोच झाला असल्याबाबत परराष्ट्रे आणि मानवाधिकार गट यांनी यापूर्वी केलेली टीका भारताने अमान्य केली होती. देशात सर्वांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी  रुजलेली  लोकशाही मूल्ये व मजबूत संस्था आहेत, असे सरकारने आवर्जून सांगितले होते.