US Iran Nuclear Talks update : अमेरिका आणि इराण या देशांमध्ये सध्या युद्धविराम असला तरीही वाटाघाटीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, अमेरिकेने इराणला पाच अटी ठेवल्याचं समोर आलं आहे. इराणच्या फार्स न्यूज एजन्सीने यासंदर्भातील वृत्त दिलं असून पूर्वीचे निर्बंध आणि धोरणात्मक निर्णयामांमुळे झालेल्या नुकसानीसाठी इराणला कोणतीही भरपाई देण्यास वॉशिंग्टनने नकार दिला आहे. याशिवाय, वाटाघाटींचा भाग म्हणून इराणने ४०० किलोग्रॅम समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करावे, अशी मागणीही अमेरिकेने केल्याचे समजते.

अहवालात नमूद केलेली आणखी एक अट अशी आहे की, इराणचा फक्त एकच आण्विक प्रकल्प कार्यान्वित राहिला पाहिजे. तसेच इराणची परदेशातील गोठवलेली २५ टक्के मालमत्ता मुक्त करण्यासही अमेरिकेने नकार दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच, अमेरिकेने विविध आघाड्यांवरील संघर्ष संपवण्याची प्रक्रिया या वाटाघाटी सुरू राहण्याशी आणि त्या पूर्ण होण्याशी जोडली आहे. ‘वायनेट न्यूज’नुसार, इराणने या अटी मान्य केल्या तरीही अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमणाचा धोका कायम राहील, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

त्या पाच अटी कोणत्या?

  • धोरणात्क निर्णयांमुळे झालेल्या नुकसानीसाठी इराणला कोणतीही भरपाई मिळणार नाही.
  • इराणने ४०० किमी समृद्द युरेनियम अमेरिकेला द्यावे
  • इराणचा फक्त एकच आण्विक प्रकल्प कार्यान्वित राहिला पाहिजे.
  • इराणची परदेशातील गोठवलेली २५ टक्के मालमत्ता मुक्त करण्यास नकार
  • इस्रायबरोबरचा आक्रमणाचा धोका कायम राहणार

युद्धात न मिळालेल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न

ट्रम्प यांनी नुकताच इराणचा १४ मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव फेटाळला आहे. इराणच्या युद्ध समाप्तीसाठीच्या वाटाघाटींच्या प्रस्तावाला उत्तर देताना अमेरिकेने कोणतीही ठोस सवलत दिली नसल्याचे इराणी माध्यमांनी रविवारी सांगितले. “युनायटेड स्टेट्स कोणतीही ठोस सवलत न देता, युद्धात मिळवता न आलेल्या सवलती मिळवू पाहत आहे, ज्यामुळे वाटाघाटींमध्ये कोंडी निर्माण होईल”, असं ‘मेहर’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इराणी माध्यमांनी असेही वृत्त दिले आहे की, तेहरानने कोणत्याही चर्चेसाठी पाच विश्वास निर्माण करणाऱ्या पूर्वअटी ठेवल्या आहेत. यामध्ये सर्व आघाड्यांवरील, विशेषतः लेबनॉनमधील संघर्ष संपवणे, इराणवरील निर्बंध उठवणे आणि इराणचा गोठवलेला निधी मुक्त करणे यांचा समावेश आहे.

इराणने युद्धाशी संबंधित नुकसानीसाठी भरपाई आणि जागतिक तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर आपल्या सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची मागणीही केली आहे. ‘तुर्किये टुडे’नुसार, इराणच्या सशस्त्र दलाच्या प्रवक्त्याने अमेरिकेला इशारा दिला आहे की, कोणत्याही नवीन लष्करी हल्ल्यांना अधिक जोरदार आणि गंभीर प्रत्युत्तर दिले जाईल. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी अमेरिकेवर लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मुत्सद्देगिरीचा (राजनैतिकतेचा) आडोसा घेतल्याचा आरोप केला आहे.

जागतिक ऊर्जा बाजारपेठेत शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आपण काम करत असल्याचा अमेरिका आणि इस्रायलचा दावा खोटा असून, प्रत्यक्षात अस्थिरता आणि संघर्ष निर्माण करण्यास तेच जबाबदार असल्याचा आरोप इस्माईल यांनी केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले, “हा त्यांचा नेहमीचा, धूर्त डाव आहे. आधी संकट आणि युद्ध निर्माण करायचे आणि नंतर स्थैर्य पुनर्संचयित करणे आणि शांततेचे रक्षण करणे या उदात्त नावाखाली परिस्थिती आणखी चिघळवायची. ते स्वतः विनाश घडवून आणतात आणि त्याला शांतता म्हणतात.”