US Iran Conflict triggers fresh military tension after Strait of Hormuz Drone Strike: अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेने इराणने ड्रोन सोडल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. यापैकी चार ड्रोन पाडण्यात आले असून प्रत्युत्तरादाखल इराणच्या किनारी भागातील निगराणी रडार केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिली आहे. या नव्या संघर्षामुळे आता पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलमार्ग संकटात आला असून पश्चिम आशियात युद्धाचे ढग पुन्हा एकदा साचू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
ताज्या संघर्षाबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून एकतर्फी सोडण्यात आलेले ड्रोन हे एकतर सामुद्रधुनीतील व्यावसायिक जहाजांना किंवा अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत असल्याचे दिसून आले आहे.
इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तर देत असताना अमेरिकन सैन्याने गोरुक आणि केशम बेटांवरील इराणच्या किनारी निगराणी रडार केंद्रांवर हल्ले केले. पुढील संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आणि सागरी वाहतुकीचे संरक्षण करण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे अमेरिकी सैन्याने म्हटले आहे.
सेंट्रल कमांडने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे सामुद्रधुनीतील सागरी वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. पुढील हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी अमेरिकी सैन्याने गोरुक आणि केशम बेटावरील इराणच्या रडार केंद्रांवर हल्ला केला. अमेरिकी सैन्य सतर्क असून आत्मसंरक्षणासाठी इराणच्या अन्यायकारक आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे.
पश्चिम आशियातील संघर्ष संपविण्यासाठी आणि युद्धविराम करण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. युद्धविरामाच्या करारावर काम सुरू असतानाच वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील तणावात ही ताजी वाढ झाली आहे.
पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात काही महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. शस्त्रसंधीचा करार झालेला असतानाही त्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप अमेरिका आणि इराणने एकमेकांवर केला आहे.
इराणचे सैन्य पूर्णपणे उद्ध्वस्त – ट्रम्प
ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकन हल्ल्यांमुळे इराणच्या लष्करी क्षमतेला बरीच हानी पोहोचली आहे. तसेच एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी म्हटले की, इराणचे सैन्य उद्ध्वस्त करण्यात आम्हाला यश आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “इराणचे बहुसंख्य ड्रोन कारखाने, अनेक प्रक्षेपण तळ आणि क्षेपणास्त्र निर्मिती क्षेत्रे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. पण त्यांच्याकडे अजूनही क्षमता आहे. इराणकडे काही क्षेपणास्त्रे उरली आहेत. तसेच ड्रोन्सही आहेत.”
‘इराणकडे २१ टक्के क्षेपणास्त्र क्षिल्लक’
इराणच्या एकूण क्षेपणास्त्र साठ्यापैकी सुमारे २१-२२ टक्के साठा शिल्लक आहे, असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प पुढे म्हणाले, “टक्केवारीत आकडेवारी सांगायचे झाल्यास इराणकडे फक्त २१ ते २२ टक्के क्षेपणास्त्र उरली आहेत. ही संख्या मोठी असली तरी आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा हल्ला केला होता, त्यापेक्षा ही संख्या नक्कीच कमी आहे.”

‘त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरला नाही’
अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झाला असला तरी वाटाघाटीतून तोडगा निघणे शक्य आहे, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी असेही सांगितले की, इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केलेल्या नाहीत. त्यामागे लष्करी दबाव हे कारण नसून इराणी नेत्यांचा अभिमान कारणीभूत आहे.
ते कणखर आहेत. त्यांना अभिमान आहे. करारामुळे अशा काही गोष्टी आहेत, ज्या त्यांना कराव्या लागतील, असा विचारही त्यांनी केला नव्हता. पण आता त्यांना हे मान्य करावे लागणार आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
