न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर भारतीय नेत्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह विविध अमेरिकी नेत्यांना दिलेल्या भेटींची यादी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने जाहीर केली आहे. ही यादी २०२४ या वर्षातील आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना लाकडी पेटी, स्कार्फ, केशर ठेवण्याचा जार आणि चहासाठीची लाकडी पेटी भेट दिली होती. याची किंमत ५६२ डॉलर इतकी होती. पंतप्रधान मोदींनी १६ जुलै २०२४ रोजी अध्यक्ष बायडन यांना दिलेल्या अन्य एका भेटवस्तूमध्ये ‘स्टर्लिंग सिल्व्हर मेटल ट्रेन सेट’चा (७,७५० अमेरिकन डॉलर्स ) समावेश आहे.
याखेरीज जिल बायडन यांना २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान मोदींकडून ‘पश्मिना शाल’ (२९६९ डॉलर) भेट दिली. तसेच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तत्कालीन अध्यक्षांचे राष्ट्रीय सुरक्षा व्यवहार सहाय्यक जेकब सुलिव्हन यांना काश्मिरी पश्मिना स्कार्फ (५९९ डॉलर) भेट दिली होती.
अमेरिकेच्या माजी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना मोदी यांनी १८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘भगवान श्रीकृष्ण रासलीला सिल्व्हर बॉक्स’ (चांदीची पेटी) (१३३० डॉलर) भेट म्हणून दिली होती. या वस्तू अमेरिकेच्या राष्ट्रीय संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत.
तीन प्राचीन कांस्य शिल्पकृती परत मिळणार
न्यूयॉर्क : अमेरिका भारताला तीन प्राचीन कांस्य शिल्पकृती परत करणार आहे. वॉशिंग्टनमधील ‘स्मिथसोनियन्स नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’ने ही माहिती दिली. या शिल्पकृती तमिळनाडूतील मंदिरांतून बेकायदा काढून घेण्यात आल्या होत्या. शिल्पकृतींपैकी एक ‘शिव नटराज’ स्वरुपातील असून, ती सन ९९०ची चोल काळातील आहेत. दुसरी शिल्पकृतीही याच राजवटीतील बाराव्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या ‘सोमस्कंद’ प्रकारातील आहे आणि तिसरी शिल्पकृती सोळाव्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील ‘संत सुंदरर आणि परवई’ यांची आहे. ही शिल्पे परत करण्यासाठी भारताबरोबर कराराची अंतिम बोलणी सुरू आहेत, असे सांगण्यात आले.

