अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी परतलं आहे. मात्र अफगाणिस्तानमधून बाहेर पडत असताना अमेरिकेकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यावरुन सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेने आयएसकेपीचे (Islamic State-Khorasan Province) दहशतवादी समजून निर्दोष व्यक्तीवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सैन्य मागे घेतलं जात असताना २९ ऑगस्टला अमेरिकेकडून अफगाणिस्तान शेवटचा स्ट्राइक करण्यात आला. यावेळी या हल्ल्यात चुकून निर्दोष व्यक्तीला लक्ष्य करण्यात आल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.

अमेरिकेचा दावा चुकीचा

न्यूयॉर्क टाइम्सने जवळपास एक डझनहून अधिक कुटुंब, त्यांचे मित्र आणि चालकासोबत बातचीत केल्यानंतर हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टमध्ये अमेरिकी लष्कराने एका निर्दोष सहाय्यक कर्मचाऱ्याला ड्रोनने हल्ला करुन हत्या केल्याचं म्हटलं आहे. हल्ल्यानंतर पेंटागन खोटं बोलत असल्याचाही आरोप न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे.

अफगाणिस्तानात २६ ऑगस्टला काबूल विमानतळावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात १७९ अफगाण नागरिक आणि अमेरिकेच्या १० सैन्याचा मृत्यू झाला होता. आयएसकेपीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर दहशतवाद्यांकडून अजून कोणते हल्ले होऊ नयेत यासाठी अमेरिकेकडून २९ ऑगस्टला ड्रोनच्या सहाय्याने स्ट्राइक करण्यात आला.

यानंतर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात १० नागरिकांचा मृत्यू झाला असून यात काही लहान मुलांचाही समावेश असल्याचं एएफपीने म्हटलं होतं. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अहमदी मारले गेले होते. त्यांच्या भावाने एएफपीसोबत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मलुगी, भाचे, पुतणी आणि भाऊ यांना स्ट्राइकमध्ये टार्गेट करण्यात आलं. हे सर्वजण कारमधून प्रवास करत होते.

अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेले अहमदी टेक्निकल इंजिनिअर होते. त्यांनी अफगाणिस्तानात न्यूट्रिशन अॅण्ड एज्युकेशन इंटरनॅशनल चॅरिटीसोबत काम केलं होतं. अफगाणिस्तानातील भुखेल्या लोकांना अन्न पुरवण्याचं काम ही संस्था करत होती. अमेरिकेत पुनर्वसनासाठी अर्ज केलेल्या लोकांमध्ये अहमदीचाही समावेश होता.

पाणी घेऊन जात असताना हल्ला

अमेरिकेने ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकी सैन्यांच्या दिशेने कारमधून बॉम्ब घेऊन येणाऱ्या दहशतवाद्याला ठार केल्याचा दावा केला होता. तसंच तो आयएसकेपीशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या रिपोर्टमध्ये ही व्यक्ती निर्दोष होती ज्याचा दहशतवादी संघटनेशी काही संबंध नव्हता असा दावा केला आहे. ही व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी पाणी घेऊन जात होती असंही सांगण्यात आलं आहे.

यासोबतच फक्त तीन लोक मारले गेल्याचा अमेरिकी सैन्याचा दावाही न्यूयॉर्क टाइम्सने फेटाळला असून खोटी माहिती दिली जात असल्याचं म्हटलं आहे. हल्ल्यात १० लोक मारले गेले असून यामध्ये सात लहान मुलं होती असं न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.