US strikes Iran Isfahan : अमेरिकेने इराणविरोधातील कारवाया वाढवल्या असून इराणला नेस्तनाबूत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच, इराणमधील इस्फाहान शहरातील एका मोठ्या दारूगोळा कोठारावरा २००० पाऊंडच्या पेनिट्रेटर (बंकर-बस्टर) बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने मंगळवारी पहाटे या हल्ल्याचे वृत्त दिले.
या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये एकामागून एक अनेक स्फोट आणि आगीच्या ज्वाळा निर्माण झालेले दिसत आहे. मात्र, कोणताही संदर्भ नसलेल्या या व्हिडिओच्या सत्यतेची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.
९०७ किलो वजनाचे बंकर-बस्टर बॉम्ब वापरले
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने म्हटले आहे की, इस्फाहानमधील लष्करी तळाला लक्ष्य करण्यासाठी सुमारे ९०७ किलो वजनाचे बंकर-बस्टर बॉम्ब वापरण्यात आले. इस्फाहान हे इराणचे महत्त्वाचे संरक्षण केंद्र असून तिथे ‘बद्र एअरबेस’ सारख्या महत्त्वाच्या सुविधा आहेत. प्राथमिक हल्ल्यानंतर परिसरात अनेक स्फोट झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
युद्धाला एक महिना पूर्ण झाला असून पाकिस्तान, इजिप्त, सौदी अरेबिया आणि तुर्की यांसारख्या प्रादेशिक सत्ता राजनैतिक तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे की, जर “नवीन आणि अधिक समजूतदार राजवटीसोबत” होणारी चर्चा यशस्वी झाली नाही आणि ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा उघडली गेली नाही, तर अमेरिका इराणची वीज केंद्रे, तेल विहिरी आणि खार्ग बेट यांसारखी ऊर्जा निर्मितीची ठिकाणे नष्ट करेल.
तर, दुसरीकडे अमेरिकेबरोबर कोणतीही प्रत्यक्षाच चर्चा सुरू नसून फक्त चर्चेबाबत प्रस्ताव आले असल्याचं इराणने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या युद्धाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या युद्धाचा जागतिक पातळीवर परिणाम होत असून जलवाहतूक ठप्प झाल्याने जगभरात पेट्रोलिअम पदार्थांचा तुटवडा निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. भारतातही एलपीजीसह अनेक इंधनांचा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचं म्हटलं जातंय.
