नवी दिल्ली / वॉशिंग्टन : इराणबरोबर युद्धविराम लागू असताना अमेरिकेने दक्षिण इराणमध्ये मंगळवारी हल्ला करून क्षेपणास्त्र प्रक्षेपक ठिकाणांना आणि पाणसुरुंग पेरणार्‍या बोटींना नष्ट केले. हल्ला स्वसंरक्षणार्थ केल्याचा दावा अमेरिकेने केला. या हल्ल्यानंतर इराणबरोबरील चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले, तर परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी इराणबरोबर करार होण्यास आणखी काही दिवस लागतील, असे स्पष्ट केले. इराणनेही अमेरिकेला प्रत्युत्तराची धमकी दिली आहे. दुसरीकडे इस्रायलने लेबनॉनमध्ये हेजबोलावरील हल्ले तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

इराणवर हल्ले करतानाही अमेरिकेने संयम बाळगल्याचे अमेरिकेच्या मध्य कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी निवेदनात म्हटले. मात्र, इराणकडून नेमका कुठला धोका होता, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. इराणमधील एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’चे चार जण ठार झाल्याचे म्हटले आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी बंदर अब्बासभोवती काही ठिकाणी स्फोट झाल्याचे सांगितले.

इराणला प्रतिहल्ल्याचा हक्क असल्याचे ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने म्हटले आहे. तसेच, इराणच्या हवाई हद्दीचा भंग केल्याबद्दल अमेरिकेचे ड्रोन इराणने नष्ट केल्याचे आणि अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर गोळीबार केल्याचेही ‘गार्ड’ने म्हटले. इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी या प्रदेशात अमेरिकेचा एकही तळ सुरक्षित राहणार नाही, असे विधान केले.

अब्राहम करारात सहभागी होण्याचे ट्रम्प यांचे आवाहन

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियासह अधिकाधिक अरब आणि मुस्लिम देशांनी अब्राहम करारात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. हा करार ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात करण्यात आला होता. या कराराद्वारे अरब देशांचे इस्रायलबरोबरील संबंध सुरळीत राहण्याचे उद्दिष्ट आहे. या करारावर संयुक्त अरब आमिराती आणि बहारीन या देशांनी सह्य केल्या आहेत. ट्रम्प यांनी सौदी अरेबिया आणि कतारने तत्काळ या करारावर सही करावी, असे आवाहन केले. सौदी अरेबियासह पाकिस्ताननेही अमेरिकेच्या आवाहनाला विरोध केला आहे.

आता यापुढे ‘अमेरिकेचा विनाश होवो’, ‘इस्रायलचा विनाश होवो’ या इस्लामिक देशांच्या आणि जगातील शोषित लोकांच्या, विशेषत: तरुणांच्या घोषणा असतील. घड्याळाचे काटे उलटे फिरवता येत नाहीत. या प्रदेशात अमेरिकेचा एकही तळ सुरक्षित राहणार नाही. – मोजताबा खामेनी, सर्वोच्च नेते, इराण.