US Sinks Iran Warship In Indian Ocean: हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेवर अमेरिकेनेच्या पाणबुडीने हल्ला करुन नौका बुडवल्याची पुष्टी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केली आहे. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर इराणी जहाजावर पाणबुडीने हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. पण, हा हल्ला कोणी केला याची माहिती समोर आलेली नव्हती. दरम्यान, अमेरिकेनेच हा हल्ला करुन युद्धनौका बुडवली असल्याचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी आता स्पष्ट केले आहे.
अमेरिकन पाणबुडीचा हल्ला
रॉयटर्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हिंदी महासागरात इराणी युद्धनौकेवर हल्ला झाल्याची माहिती श्रीलंका नौदलाला मिळाल्यानंतर मदत आणि शोधकार्य सुरु करण्यात आले होते. या युद्धनौकेतून १०१ नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. तर, ३७ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, यात एकाचा मृत्यू झाल्याचे श्रीलंकेच्या नौदलाने म्हटले होते. या युद्धनौकेवर पाणबुडीने हल्ला केल्याची माहिती समोर आली होती पण, हल्ला कोणी केली याबाबत स्पष्टता नव्हती. दरम्यान, यामागे अमेरिकाच असल्याचे आता खुद्द अमेरिकेने सांगितले आहे.
अमेरिकेचे संरक्षण सचिव काय म्हणाले?
अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. “अमेरिकेच्या पाणबुडीने इराणी युद्धनौकेवर हल्ला करुन हिंदी महासागरात बुडवली”, असे पीट हेगसेथ माध्यमांना संबोधित करताना म्हणाले. या नौकेवर १८० जण असल्याची माहिती मिळाली आहे. आयरिस देना (IRIS Dena) असे या युद्धनौकेचे नाव असल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाने दिली आहे.
इराणी युद्धनौका सरावासाठी आली होती भारतात
इराणी युद्धनौका आयरिस देना भारतात सरावासाठी आली होती. सरावानंतर या युद्धनौकेचा परतीचा प्रवास सुरु होता. बंगालच्या उपसागरात ती १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान सरावात भाग घेणार असल्याचे सरावाच्या वेळापत्रकात नोंद दिसून येते. भारतीय पूर्व नौदल कमांडने विशाखापट्टणम येथे या इराणी जहाजाचे स्वागत केले होते.
श्रीलंका नौदल, लष्कर धावले मदतीला
इराणी युद्धनौकेवर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर श्रीलंका नौदल आणि लष्कर मदतीला धावले. नौदलाने तत्काळ बचाव आणि शोधकार्य सुरु केले. श्रीलंका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इराणी युद्धनौकेतून ३२ जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे. यात १०१ जण बेपत्ता झाल्याची माहिती असून, बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
