US military conducts Minuteman III ICBM test during Iran-Israel war: मध्य पूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाला सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी आणि त्यांच्या अनेक वरिष्ठ सहकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही युद्धाची धग कमी झालेली नाही. इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता अमेरिकेने त्यांच्या अण्वस्त्र सक्षम आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची बातमी समोर येत आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानच्या हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षाही २० पट जास्त शक्तिशाली अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमेरिकेच्या एअर फोर्स ग्लोबल स्ट्राइक कमांडने कॅलिफोर्नियातील वॅंडनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून मंगळवारी रात्री ही चाचणी केली. निशस्त्र अशा मिनिटमॅन III क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राला
“डूम्सडे” क्षेपणास्त्र (Doomsday missile) असे नाव देण्यात आल्याचे यूएस स्पेस फोर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पश्चिम-मध्य पॅसिफिक महासागरातील मार्शल बेटांजवळील लक्ष्यावर धडकण्यापूर्वी या क्षेपणास्त्राने हजारो मैल यशस्वीरित्या प्रवास केल्याचेही यूएस स्पेस फोर्सने म्हटले.

मध्य पूर्वेतील युद्धाशी चाचणीचा संबंध नाही

या निवेदनात म्हटले आहे की, जीटी-२५५ या निशस्त्र क्षेपणास्त्राची चाचणी दीर्घकाळ चालणाऱ्या चाचणी प्रक्रियेचा एक भाग होता. क्षेपणास्त्र प्रणालीच्या विविध घटकांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे हा या चाचणीचा उद्देश होता. सदर चाचणी संबंध मध्य पूर्वेत चाललेल्या युद्धाशी नाही, असेही या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकन हवाई दलाच्या मते, मिनिटमॅन III क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे ६,००० मैल आहे आणि ताशी १५,००० मैल प्रति तास वेगाने ते प्रवास करू शकते. जगभरात कोणत्याही लक्ष्यांवर काही मिनिटांत मारा करण्याची क्षमता असल्यामुळे या क्षेपणास्त्राला घातक मानले जाते.

यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये मिनिटमॅन III ची चाचणी घेण्यात आली होती. आण्विक तयारीवरून अमेरिकेत त्यावेळी वाद सुरू झाला होता.

इराण युद्धाचे सहा दिवस

इराण युद्ध सुरू होऊन सहा दिवस झाले आहेत. इराणने गुरूवारी इस्रायलवर क्षेपणास्त्राचा मोठा मारा केला. यामुळे लाखो इस्रायली लोकांना बॉम्बरोधक शेल्टरचा आश्रय घ्यावा लागला. इस्रायलच्या प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजत होते.