Bo French Texas Election Defeat Indian Racism Controversy: अमेरिकेतील टेक्सास राज्यात झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बो फ्रेंच यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय आणि दक्षिण आशियाई नागरिकांविषयी वर्णद्वेषी स्वरूपाच्या पोस्ट केल्यामुळे बो फ्रेंच यांच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. टेक्सास रेलरोड कमिशनर पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जॉन रोझेंथल यांनी त्यांचा पराभव केला. फ्रेंच यांनी मंगळवारी रात्री पराभव स्वीकारला. मात्र, निवडणुकीचे अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत, असे ‘टेक्सास ट्रिब्यून’ने वृत्त दिले आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

भारतीयांविषयीच्या पोस्टमुळे बो फ्रेंच यांच्यावर टीका

बो फ्रेंच यांनी सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियावर टेक्सासमधील एका विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातील छायाचित्र शेअर केले होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने दक्षिण आशियाई नागरिक, त्यातही भारतीय मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसत होते. या छायाचित्रावर भाष्य करताना त्यांनी, “यंदाच्या वर्षी टेक्सास विद्यापीठाचा पदवीदान समारंभ असा दिसत होता असे मला सांगण्यात आले, सुरुवातीला माझा यावर विश्वास बसला नाही, मात्र परिस्थिती आपल्या कल्पनेपेक्षाही गंभीर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे,” असे म्हटले होते.

याच दिवशी केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेतील नागरिकांची जागा परदेशी नागरिक घेत असल्याचा दावा केला होता. “बॉडी कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगार उघड झाले, त्याचप्रमाणे सोशल मीडिया अमेरिकेत किती नागरिकांची जागा परदेशी लोकांनी घेतली आहे हे दाखवत आहे,” असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली; भारतातूनही अनेकांनी त्यांच्या पोस्टवर आक्षेप नोंदवले.

पराभव स्वीकारत समर्थकांचे मानले आभार

मंगळवारी रात्री बो फ्रेंच यांनी निवडणुकीतील पराभव स्वीकारला. “आजची रात्र आमच्या प्रचार मोहिमेला अपेक्षित असलेला निकाल घेऊन आलेली नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर दिली. तसेच, प्रचारादरम्यान साथ दिलेल्या समर्थकांचे आभार मानताना त्यांची निष्ठा, मैत्री आणि टेक्सास राज्यावरील प्रेम आपण कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

फ्रेंच यांनी पराभव स्वीकारल्यानंतर जॉन रोझेंथल यांनी विजय घोषित केला. टेक्सासच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर देखरेख करणाऱ्या रेलरोड कमिशनमध्ये अनेक दशकांपासून रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व होते. या निवडणुकीतील निकालामुळे त्या वर्चस्वाला आव्हान मिळाल्याचे वृत्त ‘टेक्सास ट्रिब्यून’ने दिले आहे.

काय आहे टेक्सास रेलरोड कमिशन?

टेक्सास रेलरोड कमिशन ही संस्था राज्यातील तेल आणि नैसर्गिक वायू उद्योगावर देखरेख ठेवते. तेल आणि वायू उत्खनन, पाईपलाईन, नैसर्गिक वायू सुविधा, विहिरी बंद करण्याची प्रक्रिया तसेच तेल क्षेत्रातील कचऱ्याचे व्यवस्थापन अशा विविध बाबींची जबाबदारी या संस्थेकडे आहे, त्यामुळे या आयोगाच्या निवडणुकीकडे टेक्सासमधील ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीनेही महत्त्वाने पाहिले जाते.