न्यूयॉर्क : भारत आणि अमेरिकेच्या खासगी क्षेत्रामधील सहकार्य अधिक वाढवण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय व्यापार करार महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील प्रमुख व्यापारी संघटना आणि अभ्यासगटांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी संघटनांनी या करारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रशंसा केली आहे.

दोन्ही देशांच्या उद्योग जगताकडून दीर्घकाळ या व्यापार कराराची मागणी होत होती, असे ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’च्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुझान क्लार्क यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. याचा अमेरिकी आणि भारतीय कंपन्या आणि कर्मचाऱ्यांना लाभ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. क्लार्क यांनी गेल्या वर्षी भारतीय अधिकारी आणि महत्त्वाच्या उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी मुंबई आणि दिल्लीचा दौरा केला होता.

या करारामुळे भारतीय भागीदारांना दिलासा मिळाल्याचे ‘एशिया सोसायटी पॉलिसी इन्स्टिट्यूट’च्या ज्येष्ठ उपाध्यक्ष वेंडी कटलर यांनी म्हटले आहे. कटलर यांनी अमेरिकेच्या व्यापारी करारासाठी वाटाघाटी करण्याचे काम केले आहे. “दुर्मीळ संयुगे, तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी एकत्रित काम करण्याचा मार्ग खुला झाला,” असे कटलर यांनी सांगितले. आसियान गटातील इतर देशांपेक्षा सर्वात कमी आयातशुल्क असल्याचा भारताला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर, दोन्ही देशांमधील निर्यातदारांना फायदा होण्याची अपेक्षा ‘एशिया ग्रुप’च्या अमन राज खन्ना यांनी व्यक्त केली.

कोट या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारांबरोबर भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या सर्वंकष व्यापार करारामुळे खासगी क्षेत्रातील सहकार्य अधिक वाढेल. आम्ही कराराच्या तपशीलांचा आढावा घेत आहोत. – सुझान क्लार्क, अध्यक्ष, ‘यूएस चेंबर ऑफ कॉमर्स’

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली परिणामकारक भागीदारीसाठी मोठा विजय. या करारामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था आणि जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील. – विनय क्वात्रा, भारताचे अमेरिकेतील राजदूत

महत्त्वाचे, सकारात्मक पाऊल!

‘यूएस-इंडिया स्ट्रॅटिजिक पार्टनरशिप फोरम’ने (यूएसआयएसपीएफ) कराराचे स्वागत करताना हे ‘महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल’ असल्याचे म्हटले आहे. या द्विपक्षीय करारामुळे दोन्ही देशांतील उद्योग, कर्मचारी आणि ग्राहकांनाही फायदा होईल. त्याबरोबरच हिंद-प्रशांत महासागरी प्रदेशात स्थैर्य आणि शांततेसाठीही हा करारा महत्त्वाचा असल्याचे ‘यूएसआयएसपीएफ’ने नमूद केले आहे.

‘रशियाच्या आक्रमतेला आळा बसेल’

या करारामुळे भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्यामुळे रशियाच्या आक्रमकपणाला आळा बसेल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. सेनेटच्या परराष्ट्र संबंधांविषयक समितीचे अध्यक्ष जिम रिश यांनी एक्सवर लिहिले की, रशियाच्या ऊर्जा क्षेत्राला भारताचा मिळणारा पाठिंबा बंद झाल्यामुळे आता अमेरिकेला रशियाच्या आक्रमकपणाला उत्तर देणे शक्य होईल, तसेच युक्रेन युद्धसमाप्तीस मदत मिळेल. या करारामुळे युक्रेन युद्ध थांबवण्यास मदत होईल, अशी आशा अमेरिकी वंशाचे भारतीय अॅटर्नी रवी बात्रा यांनीही व्यक्त केली आहे.

घटनाक्रम

१३ फेब्रुवारी २०२५ – भारत आणि अमेरिकेची व्यापारी संबंध दृढ करण्यावर सहमती झाल्याचे पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन. द्विपक्षीय व्यापार सध्याच्या १९१ अब्ज डॉलरपासून २०३०पर्यंत ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट.

४ ते ६ मार्च – वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची वॉशिंग्टन डी.सी.ला भेट, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि वाणिज्यमंत्री हॉवर्ड ल्युटनिक यांच्याशी चर्चा

२ एप्रिल – डोनाल्ड ट्रम्प यांची भारतीय मालावर २६ टक्के आयातशुल्काची घोषणा

९ एप्रिल – भारतीय मालावरील २६ टक्के आयातशुल्क ९० दिवसांसाठी स्थगित

२३-२९ एप्रिल – भारताचे मुख्य वाटाघाटी अधिकारी राजेश अग्रवाल वॉशिंग्टन दौऱ्यावर, अमेरिकी अधिकाऱ्यांशी १९ मुद्द्यांवर चर्चा

१७-२० मे – वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचा वॉशिंग्टन दौरा, जेमिसन ग्रीर आणि ल्युटनिक यांच्याशी चर्चा

४-१० जून – अतिरिक्त व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे शिष्टमंडळ भारताच्या दौऱ्यावर; बाजारपेठेतील प्रवेश, डिजिटल व्यापार, सीमाशुल्क सुलभीकरण यावर चर्चा

२६ जून – राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ वॉशिंग्टनच्या दौऱ्यावर

२७ जून – भारताबरोबर अमेरिका फार मोठा व्यापार करार करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

३१ जुलै – अमेरिकेची भारतावर ७ ऑगस्टपासून २५ टक्के आयातशुल्काची घोषणा

६ ऑगस्ट – रशियाकडून तेलखरेदी करत असल्याबद्दल दंड म्हणून भारतावर २७ ऑगस्टपासून अतिरिक्त २५ टक्के आयातशुल्क लादत असल्याची ट्रम्प यांची घोषणा

१६ सप्टेंबर – व्यापार प्रतिनिधींची भारतीय अधिकाऱ्यांबरोबर व्यापार कराराच्या विविध पैलूंवर चर्चा

२२ सप्टेंबर – पीयूष गोयल आणि राजेश अग्रवाल व्यापार चर्चेसाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल

१५-१७ ऑक्टोबर – भारताचे पथक वॉशिंग्टनमध्ये दाखल, आतापर्यंत चर्चेच्या सहा फेऱ्या पूर्ण

१० डिसेंबर – अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रिक स्वित्झर दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीमध्ये दाखल, राजेश अग्रवाल यांच्याबरोबर चर्चा

१२ जानेवारी २०१६ – व्यापार करार करण्यासाठी दोन्ही बाजू सक्रिय असल्याचे अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत सर्गेई गोर यांचे वक्तव्य

३१ जानेवारी – भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच होणार असल्याचा सर्गेई गोर यांचा पुनरुच्चार

२ फेब्रुवारी – डोनाल्ड ट्रम्प यांची व्यापार कराराची घोषणा