भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराचा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यादरम्यान ट्रम्प प्रशासनातील अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (USTR) प्रसिद्ध केलेल्या एका नकाशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नकाशामध्ये संपूर्ण जम्मू आणि काश्मीरचा भाग, ज्यामध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीर, यासह चीनकडून दावा केला जाणारा अक्साई चीन हा प्रदेश देखील भारताचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. या नकाशाने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारताच्या प्रादेशिक सार्वभौमत्वासाठी अमेरिकेच्या कुठल्याही मान्यतेची आवश्यकता नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, ही भूमिका भारताने नेहमीच ठामपणे मांडली आहे. असे असले तरी, अमेरिकेच्या जुन्या धोरणात झालेला हा मोठा बदल आहे.
भारताचा हा अचूक नकाशा भारत अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापार कराराच्या अधिकृत कम्युनिकेशनचा भाग म्हणून शेअर करण्यात आला आहे. या नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीर, लडाखमधील अक्साई चीन आणि अरूणाचल प्रदेश हे भारताच्या सीमेमध्ये दाखवण्यात आले आहेत.
नकाशा इतका का महत्त्वाचा आहे?
यापूर्वी अमेरिका किंवा त्यांच्या स्टेट डिपार्टमेंटकडून जारी करण्यात आलेल्या नकाशामध्ये पाकिस्तानच्या दावे लक्षात घेऊन पाकिस्तान व्याप्त काश्मीर दाखवले त असे. मात्र आता नुकतेच ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या नकाशामध्ये पाकिस्तानच्या दाव्यांचा कसलाही विचार केल्याचे दिसत नाही.
ट्रम्प प्रशासनाकडून हा नकाशा शेअर करण्याची वेळही महत्त्वाची आहे. अनेक दिवसांच्या व्यापार तणावानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा नव्याने प्रस्थापित केले जात आहे. व्यापर करारासंबंधी वाटाघाटी सुरू होत्या आणि या काळात ट्रम्प यांनी भारतीय मालावर ५० टक्के टॅरिफ लादले होते.
फक्त पीओकेच नाही तर या नकाशात लडाखच्या ईशान्य भागात असलेला वादग्रस्त अक्साई चीन हा प्रदेश देखील भारताचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. भारताने वारंवार घेतलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करत चीनने नेहमीच या वादात असलेल्या भूभागावर आपला दावा सांगितला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे स्टेट डिपार्टमेंट आणि इतर जागतिक संस्थांच्या नकाशांवरील भारताच्या सीमांच्या, खासकरून जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशच्या या राज्यांच्या सीमा चुकीच्या दाखवत असल्याबद्दल सातत्याने आक्षेप नोंदवला आहे. अमेरिकेने नुकतेच शेअर केलेल्या या नकाशामुळे अखेर भारताच्या अनेक वर्षांपासूनच्या चिंतेची दखल घेतली गेली आहे.
