India-EU Trade Deal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल ५० टक्के टॅरिफ लादलेला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी ५० टक्के कर द्यावा लागत आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताच्या विरोधात बोलत असल्यामुळे अमेरिका आणि भारताचे व्यापारी संबंध ताणले गेले आहेत.
या घडामोडी सुरू असतानाच आता भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करार होत आहे. या कराराची अधिकृत घोषणा आज २७ जानेवारी रोजी केली जात आहे. मात्र, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार होत असल्याचं पाहून अमेरिकेचा जळफळाट झाला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी युरोपियन युनियनवर (EU) गंभीर आरोप केला आहे.
‘युरोपियन युनियन स्वतः विरुद्धच्या युद्धाला फायनान्स करत आहे’, असं मोठं वक्तव्य अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी केलं आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये होत असलेल्या मुक्त व्यापार करारामुळे अमेरिका नाराज झाल्याची चर्चा आहे. याबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एबीसी न्यूजशी बोलताना हे भाष्य केलं.
स्कॉट बेसेंट यांनी युरोपियन युनियनवर थेट रशिया-युक्रेन युद्धाला निधी पुरवल्याचा आरोप करत युरोपियन युनियन स्वतः विरुद्धच्या युद्धाला फायनान्स करत असल्याचा आरोप केला. स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं की, “गेल्या आठवड्यात काय घडलं? याचा विचार करा, आम्ही भारतावर कर लादला आणि युरोप त्यांच्यासोबत व्यापार करार करत आहे. रशिया त्यांचं कच्च तेल भारतात पाठवतो. भारतात तेल शुद्ध केलं जातं आणि नंतर युरोपला विकलं जातं. तांत्रिकदृष्ट्या युरोप हे शुद्ध उत्पादन खरेदी करत आहे, जे प्रत्यक्षात रशियन तेल आहे. ते (युरोपियन देश) स्वतःविरुद्ध युद्धासाठी निधी पुरवत आहेत”, असं स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं आहे.
