We Have Plenty of Money for Iran War: “इराणविरुद्धच्या युद्धासाठी अमेरिकेकडे खूप पैसा आहे. मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत”, असे वक्तव्य अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी रविवारी दिली. बेसेन्ट यांनी इराणविरुद्धच्या युद्धाचे समर्थन करताना डोनाल्ड ट्रम्प यांची पाठराखण केली. कायदेशीर चौकटीत राहूनच ट्रम्प यांनी पाऊल उचलले असल्याचे बेसेन्ट यांनी नमूद केले. एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बेसेन्ट बोलत होते.
काय म्हणाले बेसेन्ट स्टॉक?
“युद्ध कायद्याच्या अंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांना असलेल्या अधिकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्याकडे या युद्धासाठी खूप पैसा आहे. आता आम्ही जे करत आहोत ती केवळ पूरक कारवाई आहे”, असे स्कॉट बेसेन्ट म्हणाले. “ट्रम्प यांनी पहिल्या टर्ममध्ये लष्कर चांगल्या पद्धतीने उभं केलं, सामर्थ्य दिलं. आणि दुसऱ्या टर्ममध्ये पण त्यासाठी उत्तम काम करत आहेत. भविष्यात देखील हे काम असचं सुरु राहावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत”, असे बेसेन्ट मुलाखतीत बोलताना म्हणाले.
अतिरिक्त निधीची मागणी
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी भाष्य केल्याप्रमाणे प्रशासन या युद्धासाठी सुमारे २०० अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त निधीची मागणी करू शकते. अमेरिकेची लष्करी सज्जता टिकवून ठेवण्यासाठी ही एक छोटी किंमत असल्याचे त्यांनी म्हटले होते. या निधीमुळे लष्कराची तयारी आणि ताकद सुनिश्चित करण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले होते. पण, युद्धासाठी शस्त्रास्त्रांची कमतरता असल्याच्या माहितीचे त्यांनी खंडन केले होते. “आमच्याकडे शस्त्रसाठी खूप आहे. पण, आम्ही तो जतन करत आहोत”, असे ट्रम्प म्हणाले होते.
काँग्रेसकडूनही मदत घेणार?
अतिरिक्त निधीबाबत प्रशासन काँग्रेसकडे देखील मदत मागण्याची शक्यता अमेरिकी युद्ध सचिव पेट हेगसेठ यांंनी बोलून दाखवली आहे. ऑपरेशन एपिक फ्युरीबाबत बोलताना २०० अब्ज डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक पैसा लागू शकतो. शत्रूला संपविण्यासाठी पैसा तर लागतोच, असे पेट हेगसेठ म्हणाले होते. स्टॉक बेसेन्ट यांनी देखील डोनाल्ड ट्रम्प सर्व पर्याय खुले ठेवत असल्याचे मत मांडले आहे.
संघर्ष थांबण्याची शक्यता धूसर?
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरोधात संयुक्त हल्ला केला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. आज तीन आठवड्यानंतर देखील यांच्यातील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. तिन्ही देशांकडून चर्चेसाठी नकार दिला जात असून, हल्ले – प्रतिहल्ले सुरुच आहे. या संघर्षाचा जगाच्या अर्थकारणावर तसेच, इंधन आणि गॅस पुरवठ्यावर गंभीर परिणाम दिसायला लागले आहेत. दरम्यान, संघर्षात गुंतलेले देश वाटाघाटीकरुन चर्चेतून मार्ग काढतील अशी अपेक्षा असताना अमेरिकेकडून समोर आलेल्या वक्तव्यांमुळे संघर्ष लवकर थांबण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगितले जात आहे.
