Khawaja Asif toilet paper remark Pakistan: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानचा संदर्भ देत अमेरिकेवर तीव्र शब्दात टीका करत. पाकिस्तानने यापूर्वी घेतलेल्या विविध निर्णयांवर नाराजी देखील त्यांनी व्यक्त करत, पूर्वीच्या सरकारचाही समाचार घेतला. ‘इस्लामच्या रक्षणासाठी अफगाणिस्तानच्या भूमीवर झालेल्या दोन्ही युद्धांत पाकिस्तानने सहभाग घेतला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धात जिहादच्या नावाखाली आपल्या लोकांना मारण्यात आले. पण, पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही’, असे मंत्री ख्वाजा आसिफ संसदेत बोलताना म्हणाले.

अमेरिकेने टॉयलेट पेपरसारखे वापरुन फेकून दिले- ख्वाजा आसिफ

अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यासाठी १९९९ नंतर पाकिस्तान पुन्हा युद्धात सहभागी झाला. याची मोठी किंमत भविष्यात पाकिस्तानला चुकती करावी लागली. ख्वाजा आसिफ यांना या निर्णयांसाठी माजी लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि जनरल परवेझ मुशर्रफ यांना जबाबदार धरले. झिया-उल-हक आणि मुशर्रफ यांच्यावर टीका करताना, ‘अमेरिकेने पाकिस्तानचा टॉयलेट पेपरसारखा वापर करुन फेकून दिले’, असे ख्वाजा आसिफ म्हणाले.

शिक्षणात बदल

‘अफगाणिस्तानविरुद्धच्या युद्धांना पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले. यामध्ये आजपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही’, असा खुलासाही मंत्री आसिफ यांनी केला. दुसऱ्यांच्या युद्धात पाकिस्तान एखाद्या मोहऱ्यासारखा सिद्ध झाला, अशी खंत आसिफ यांनी संसदेत व्यक्त केली.

अमेरिकेला पाठिंबा देणे सर्वात मोठी चूक

‘अफगाणिस्तानमध्ये १९८० च्या दशकात रशियाच्या विरोधात उठाव झाला, अमेरिकेनेच याला खतपाणी घातले होते. पाकिस्तानमध्ये त्यावेळी असलेल्या सरकारला अमेरिकेच्या कुबड्या पाहिजे होत्या, त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना यात सामिल केले. आणि हीच सर्वात मोठी चूक होती’, असा आरोप ख्वाजा यांनी तत्कालिन सरकारवर केला. रशियाविरुद्धच्या युद्धाला अफगाणिस्तानने जिहाद नाव दिले होते पण, हा जिहाद नव्हता, असेही ख्वाजा म्हणाले.

अमेरिकेसाठी पाकिस्तान तालिबानच्या विरोधात गेला

‘रशिया अफगाणिस्तानच्या युद्धात पाकिस्तानला सहभाग घेण्याचा काहीच संबंध नव्हता पण, तरीही पाकिस्तानने या युद्धात सहभाग घेतला. २००१ साली अमेरिकेसाठी आपण तालिबानच्या विरोधात गेलो. आता अमेरिका तर निघून गेली पण, पाकिस्तान या सर्व गोष्टींचे नुकसान झेलत आहे’, अशी खंत मंत्री ख्वाजा आसिफ संसदेत बोलताना व्यक्त केली.