Latest News about US Iran war: मध्यपूर्वेत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणला नवा इशारा दिला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले की, आज इराणवर हल्ल्यांचा ‘सर्वात तीव्र’ दिवस असू शकतो.

पत्रकारांशी संवाद साधताना हेगसेथ म्हणाले, “आज पुन्हा एकदा इराणमध्ये हल्ल्यांचा सर्वात तीव्र दिवस असेल. सर्वाधिक लढाऊ कारवाया, सर्वाधिक बॉम्बहल्ले आणि सर्वाधिक आक्रमणे होतील. आमची गुप्तचर यंत्रणा पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय आणि सक्षम झाली आहे”, असे वृत्त बीबीसीने दिले आहे.

“इराणची लष्करी ताकद कमकुवत”

यावेळी त्यांनी इराणच्या लष्करी क्षमतेत घट झाल्याचा दावा करत अमेरिकन सशस्त्र दलांच्या कारवाईवर भर दिला. गेल्या २४ तासांत इराणकडून सर्वात कमी क्षेपणास्त्रे डागण्यात आली असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, अमेरिकन सैन्याने इराणची लष्करी ताकद कमकुवत करण्यात यश मिळवले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेला दुजोरा देत हेगसेथ म्हणाले की, अमेरिका सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षात निर्णायक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. ट्रम्प यांनी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अमेरिकन सैन्य सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले

“…आम्ही मागे हटणार नाही”

“आम्ही तांत्रिक कौशल्य आणि लष्करी शक्तीचे प्रभावी प्रदर्शन करत शत्रूवर कारवाई करत आहोत. शत्रू पूर्णपणे आणि निर्णायकपणे पराभूत होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही,” असे हेगसेथ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांनी पुढे असेही सांगितले की अमेरिकन सैन्य आपल्या लक्ष्यांवर ठामपणे केंद्रित आहे.

“हल्ल्यांसाठी शाळा आणि रुग्णालयांचा वापर”

दरम्यान, हेगसेथ यांनी इराणवर गंभीर आरोपही केले. ते म्हणाले की, अमेरिकन कारवाईमुळे इराण हताश झाला असून ते शाळा आणि रुग्णालयांसारख्या ठिकाणांमधून क्षेपणास्त्रे डागत आहेत. “इराणचे अधिकारी शाळा आणि रुग्णालयांमधून जाणूनबुजून क्षेपणास्त्रे डागत आहेत आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करत आहेत. त्यांना माहित आहे की त्यांचे सैन्य पद्धतशीरपणे कमकुवत केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.