Middle East Crisis : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा केल्यानंतर या संघर्षात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन्ही देशातील तणावामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

तसेच होर्मुझ सामुद्रधुनीत देखील तणाव निर्माण झाला असून याचा फटका जागतिक व्यापाराला बसत असल्याने अनेक देशांवर याचे गंभीर परिणाम होत आहेत. यातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. जॉर्डनमधील अमेरिकेच्या लढाऊ विमानांना लक्ष्य करत मोठा क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. या हल्ल्यात अमेरिकी लढाऊ विमानांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने एक निवेदन जारी केलं आहे. जॉर्डनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकी लढाऊ विमानांना आणि टँकर्सना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इराणने निवेदनात केला आहे. या निवेदनात असंही म्हटलं की, या हल्ल्यात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि असंख्य ड्रोन वापरण्यात आले आहेत. तसेच या हल्ल्यात अनेक अमेरिकी टँकर्स आणि अनेक अमेरिकी लढाऊ विमानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचा दावा इराणने केला आहे.

जॉर्डनमधील अमेरिकी लढाऊ विमानांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याच्या इराणच्या दाव्यावर अद्याप अमेरिकेकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. वृत्तानुसार, इराणने कुवेतमध्ये अनेक ठिकाणी केलेल्या हल्ल्यांमध्ये हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम प्लॅटफॉर्म आणि क्षेपणास्त्रे नष्ट केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, इराणच्या म्हणण्यांनुसार, या ठिकाणी अमेरिकी सैन्य आणि इस्रायल-समर्थित लढाऊ सैनिक तैनात आहेत. इराणच्या हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने अमेरिकेच्या विशेष दलाचे सैनिक मारले गेले आहेत. तसेच प्रत्युत्तरादाखल या कारवाया सुरू असल्याचं इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने एका निवेदनात म्हटलं आहे.