नवी दिल्ली : अमेरिकेने लादलेले भरमसाठ आयात शुल्क चुकवण्यासाठी चीनने भारतासह सुमारे ४० हून अधिक देशांना ‘छुप्या मार्गा’सारखे वापरल्याचा गंभीर आरोप व्हाईट हाऊसच्या ताज्या अहवालात करण्यात आला आहे. इतर देशांमध्ये थोडीफार प्रक्रिया आणि वेष्टनांत बदल करून, अमेरिकेत धाडल्या जाणाऱ्या चिनी वस्तूंद्वारे अब्जावधी डॉलरचे आयात शुल्क चुकवले गेल्याचे सांगणाऱ्या ‘ग्रेट ट्रान्सशिपमेंट स्कॅम’ असे नाव दिले गेलेल्या या अहवालात, भारताच्या भूमिकेवरही ठपका ठेवण्यात आला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांच्या अंदाजानुसार, या बेकायदा व्यापार मार्गाच्या माध्यमातून ६,००० कोटी डॉलरच्या वस्तू अमेरिकेत आल्या. यामुळे अमेरिकी सरकारला अब्जावधी डॉलरच्या आयात शुल्कावर पाणी सोडावे लागले. अशा प्रकारे बेकायदा व्यापार मार्गामध्ये सहभागी असलेल्या देशांवर कठोर कारवाईची मागणी या अहवालात करण्यात आली आहे. या देशांविरोधात तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई, दंडात्मक शुल्क आकारणी आणि बाजारपेठेत मनाई असे पाऊल उचलण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
व्हाईट हाऊसच्या अहवालात छुप्या व्यापार मार्गाचे जाळे २०१८पासून सुरू झाल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी चीनबरोबरच्या व्यापारात तूट असल्याने तत्कालीन ट्रम्प प्रशासनाने चिनी वस्तूंवर जादा आयात शुल्क आकारले होते. यानंतर चिनी निर्यातदारांनी इतर देशांच्या मार्गे आपली उत्पादने अमेरिकेत पाठविण्यास सुरूवात केली. आधी थेटपणे अमेरिकेत निर्यात होणारी चिनी उत्पादने इतर देशांमध्ये पाठविण्यात येऊ लागली. या देशांमध्ये या उत्पादनांवर किरकोळ प्रक्रिया, मर्यादित जुळणी, वेष्टन बदलणे अशा स्वरूपाच्या सोपस्कारानंतर, ती पुन्हा अमेरिकेत निर्यात करण्यात आली. यामुळे या उत्पादनांच्या निर्यातीचा देश बदलला असला तरी मूळ उत्पादने चिनीच होती, असा अहवालाचा दावा आहे.
भारतासमोर अडचणी वाढणार
रशियाकडून खनिज तेल व वायूची खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्के आयात शुल्क आकारणी करण्याचे विधेयक अमेरिकेच्या संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केले. या विधेयकात प्रमुख पाच देशांवर भर देण्यात आला असून, त्यात चीनसह भारत, स्लोव्हाकिया, हंगेरी, अझरबैजान यांचा समावेश आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू असून, नव्याने पुढे आलेल्या अहवालातून त्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
व्यापार घोटाळ्याचे ‘पुणे कनेक्शन’
व्हाइट हाऊसच्या अहवालात भारतातील पुणे-गुजरात-चेन्नई या उत्पादनपट्ट्याचा उल्लेख आहे. पंप आणि कॉम्प्रेसर निर्मिती या पट्ट्यात होते. पुण्यातून चिनी पंप हे भारतीय उत्पादन म्हणून अमेरिकेत पाठविले गेले. ज्या परिणामी अमेरिकेतील सिनसिनाटी, डेटन आणि कोलंबस या क्षेत्रातील उद्योगांना फटका बसला, असा अहवालाचा टीकात्मक रोख आहे.
जगभरात ४० देशांचे जाळे
जगभरात ४० देशांमध्ये या छुप्या व्यापार मार्गाचे जाळे विस्तारलेले आहे. या जाळ्याचा वापर करून चीन आपली उत्पादने इतर देशांच्या माध्यमातून अमेरिकेत पाठवत आहे. या उत्पादनांवर त्यामुळे कमी आयात शुल्क आकारले जाते. चीनमधून गेल्या वर्षी ६,७०० कोटी डॉलरची उत्पादने मेक्सिको, भारत आणि व्हिएतनाम या देशांच्या मार्गे अमेरिकेत पोहोचली. यातून अमेरिकेला २,८०० कोटी डॉलरच्या आयात शुल्कावर पाणी सोडावे लागले, असा अंदाज अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने वर्तविला आहे.
