USA Ex NSA John Bolton On Donald Trump : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचा जगातील अनेक देशांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे जगातील अनेक देशांना होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, तरीही हे युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणला दररोज वेगवेगळ्या धमक्या देणारी विधाने करत आहेत. तर काही दिवसांपूर्वी अमेरिकेने अशाच प्रकारे व्हेनेझुएला या देशावरही हल्ला केला होता आणि हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केलं होतं. दरम्यान, अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराण जशासं तसं प्रत्युत्तर देत असल्यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.
या सर्व घडामोडींवर आता अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भाष्य करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या संदर्भात बोलताना जॉन बोल्टन यांनी म्हटलं की, ‘इराण हा व्हेनेझुएला नाही. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे आधीही चुकीचे होते आणि आताही चुकीचेच आहेत’, असं म्हणत जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर टीका केली.
जॉन बोल्टन काय म्हणाले?
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरू असल्यामुळे अमेरिकेला आर्थिक आणि शस्त्रास्त्रांच्या बाबतीत मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. तसेच इराणही या युद्धातून मागे हटण्याची चिन्ह दिसत नाहीत. या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जॉन बोल्टन यांनी इराणच्या परिस्थितीची चुकीची गणना केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली.
जॉन बोल्टन म्हणाले की, “ट्रम्प यांना असं वाटतं की अमेरिका व्हेनेझुएलामधील कृतींप्रमाणे इराणमध्येही शासन बदल शकेन. मात्र, व्हेनेझुएलाची इराणशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. ट्रम्प यांच्याकडे संघर्ष हाताळण्यासाठी दीर्घकालीन धोरणात्मक नियोजन नाही”, असा आरोपही जॉन बोल्टन यांनी केला. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
जॉन बोल्टन यांनी म्हटलं की, “ट्रम्प यांना कदाचित असं वाटलं असेल की ते इराणमध्येही व्हेनेझुएला प्रमाणे करू शकतात. पणजर त्यांनी तसं केलं असेल तर ते चुकीचं होतं आणि आहे. ट्रम्प अनेकदा तपशीलवार नियोजनाशिवाय मोठे निर्णय घेतात. त्यामुळे मला शंका आहेत. कारण ते धोरणात्मक विचारसरणीचे पालन करत नाहीत”, अशी टीका जॉन बोल्टन यांनी ट्रम्प यांच्यावर केली.
