चीनच्या धमकया झुगारून देत अमेरिकेची युद्धनौका दक्षिण चीन सागरात आली असून या भागात नौदल मोहिमा अमेरिका चालू ठेवील असे संरक्षण मंत्री अ‍ॅशटन कार्टर यांनी सांगितले. दरम्यान चीनने अमेरिकेचे राजदूत मॅकस बॉकस यांना बोलावून अमेरिकेने युद्धनौका दक्षिण सागरात आणल्याच्या कृतीबाबत जाहीर निषेध नोंदवला.

अमेरिकेची युद्धनौका चीनने दावा सांगितलेल्या दक्षिण चीन सागरात आली आहे. चीनने या सागरातील १२ मैलांच्या भागावर दावा सांगितला असून तिथे आपले वर्चस्व दाखवण्यास सुरूवात केली आहे. या परिस्थितीत अमेरिकेची युद्धनौका तेथे आली असून नौदल मोहिमांसाठी ती पाठवण्यात आली आहे असे अ‍ॅशटन कार्टर यांनी अमेरिकी काँग्रेसला सांगितले.
आम्ही आंतरराष्ट्रीय संकेतानुसार जिथे हवाई वाहतूक, जहाज वाहतूक करणे शक्य आहे त्या सर्व ठिकाणी जाऊ असे त्यांनी स्पष्ट केले. आशिया-पॅसिफिक समतोल चीनच्या आक्रमकतेने ढासळत चालला आहे त्यामुळे आम्ही युद्धनौका तेथे पाठवली आहे. अमेरिकी नौदलाची युद्धनौका दक्षिण चीन सागरात आली असून आम्हाला दक्षिण चीन महासागरात मोहिमांचे स्वातंत्र्य आहे, असे व्हाईट हाऊसचे उपप्रसिद्धी सचिव एरिक शुल्झ यांनी सांगितले. दक्षिण चीन सागरात चीनची युद्धनौका नेमकी काय भूमिका पार पाडणार आहे ते सांगण्यास त्यांनी नकार दिला.
अमेरिकाच प्रक्षोभक कारवाया करीत असल्याच्या आरोपाला उत्तर देण्याचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते जॉन किरबी टाळतानाच त्यांनी चीनबरोबरचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावरही भर दिला.