USA Iran peace negotiations Islamabad: अमेरिका आणि इराण यांच्यात अपेक्षित शांतता चर्चेची दुसरी फेरी फिस्कटल्याने दोन्ही देशातील संघर्ष पुन्हा उफाळणार का? याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्याने दुसरी फेरी केव्हा होणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात होणारी नियोजित उच्चस्तरीय चर्चा होऊ शकली नाही. दरम्यान, दोन्ही देशांमध्ये कराराच्या मसुद्यावर अद्याप एकमत झाले नसल्याचे पाकिस्तानने देखील मान्य केले आहे.

पाकिस्तानकडून मध्यस्थी

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात युद्धात सुरुवातीला दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर केला. या यद्धविरामाची मुदत समाप्त होण्यापूर्वी दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चेच्या अपेक्षित फेऱ्या पूर्ण होऊन या संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा निघणे अपेक्षित होते. पण, पहिल्या चर्चेनंतर दुसऱ्यांदा उभय देशात चर्चा होऊ शकली नाही. पाकिस्तान दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थ म्हणून काम करत आहे. सध्या समोरासमोर चर्चा झाली नसली तरी मध्यस्थांद्वारे वाटाघाटी सुरू असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.

इराण आणि अमेरिकीच्या अटी

इराणकडून टप्प्याटप्प्याने अंमलात येईल असा प्रस्ताव अमेरिकेसमोर मांडला आहे. यामध्ये त्यांनी आधी युद्ध थांबवणे आणि ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’व्यापारासाठी खुली करणे याला प्राधान्य दिले आहे. अण्वस्त्र कार्यक्रमाबाबतची चर्चा नंतरच्या टप्प्यात करण्याचे मत इराणचे मांडले आहे. दुसरीकडे, जोपर्यंत इराण आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमावर मर्यादा आणत नाही, तोपर्यंत कोणताही करार शक्य नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

इराणाला संपर्क करण्याची सूचना

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी प्रतिनिधींचा इस्लामाबाद दौरा रद्द केला आहे. तसेच, आता इराणला चर्चा करायची असल्यास थेट संपर्क साधण्यास सांगितले आहे. दरम्यान, इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी केलेली कडक सुरक्षा आता शिथिल करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंच्या मागण्यांमध्ये मोठी तफावत असल्यामुळे तोडगा निघण्यास विलंब होत आहे. जोपर्यंत ठोस सहमती होत नाही, तोपर्यंत कोणतीही प्रत्यक्ष भेट होणार नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या चर्चेवर आता अनिश्चिततचे सावट निर्माण झाले आहे.

इराणी नेत्यांची रशिया भेट

इराण आणि अमेरिका यांच्या सध्या थेट संवाद होत नसला तरी पाकिस्तान चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे इराणी नेत्यांनी नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली. पुतिन यांनी दोन्ही देशातील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले. शिवाय त्यांनी मोजतबा खामेनी यांचा संदेश प्राप्त झाल्याचेही नमूद केले.