रॉयटर्स, जेरुसलेम / इस्लामाबाद
अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपण्याची आशा तयार झाली असून, पाकिस्तानच्या मध्यस्थीने महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अणुकार्यक्रमाचा मुद्दा मात्र अद्याप सुटला नसल्याचे इराणने सांगितले. होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती अमेरिकेची नाकेबंदी सुरूच आहे. दोन्ही देशांत चर्चेची दुसरी फेरी पाकिस्तानमध्येच होण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि इराणला चर्चा पुन्हा सुरू करायची असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. मात्र, चर्चेची निश्चित वेळ अद्याप ठरलेली नाही. दरम्यान, ‘पाकिस्तान करीत असलेली मध्यस्थी आणि चर्चा सकारात्मक असून, इराणबरोबर कराराच्या शक्यतेबाबत आम्हाला आशा आहे,’ असे वक्तव्य व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी केले. अमेरिका युद्धविराम दोन आठवड्यांनी वाढविणार असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख महंमद इस्लामी यांनी अमेरिकेबरोबर करार करताना इराणच्या हक्कांचे रक्षण होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचे तेहरानमध्ये बुधवारी आगमन झाले. अमेरिका आणि इराणमधील युद्ध पुन्हा सुरू होऊ नये, यासाठी दोन्ही देशांत पुन्हा चर्चा व्हावी, याचे नियोजन करण्यासाठी ते इराणला आले आहेत. मुनिर यांच्या इराण दौर्यामुळे चर्चेची दुसरी फेरी होण्याबाबत आशा तयार झाल्याची माहिती इराणच्या उच्चपदस्थांनी दिली. मात्र, इराणच्या अणुकार्यक्रमावरून झालेले मतभेद अद्याप कायम आहेत.
लेबनॉनही महत्त्वाचा मुद्दा
अमेरिका आणि इराणमध्ये अणुकार्यक्रमाबरोबरच लेबनॉनमधील युद्धविरामही महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. इराणबरोबर युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतरही इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले कायम ठेवले आहेत.
इस्रायलच्या कॅबिनेटने बुधवारी लेबनॉनमध्ये युद्धविरामाबाबत चर्चा केली. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू लेबनॉनचे अध्यक्ष जोसेफ औन यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती इस्रायलच्या कॅबिनेटमधील गिला गॅमलएल यांनी दिली.
(पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी इराणचे संसद सभापती मोहम्मद बागेर घालीबाफ यांनी गुरुवारी भेट घेतली.)
