USA Iran Peace Proposals: अमेरिका आणि इराणमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षावर तोडगा काढण्याच्या दिशेने ट्रम्प प्रशासन पावले उचलत असल्याचे समोर आले आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने सकारात्मकता दर्शवली आहे. अमेरिकेने संघर्ष थांबविण्यासाठी १५ मुद्दे पाकिस्तानच्या माध्यमातून इराणसमोर मांडले असल्याचे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केले आहे. यामध्ये इराणने युरेनियमचे संवर्धन थांबवावे, होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी आणि अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न बंद करावेत, अशा अटी या शांती प्रस्तावात ठेवण्यात आल्या आहेत. या बदल्यात इराणने देखील काही अटी युद्धबंदीसाठी ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
अमेरिकेने इराणसमोर कोणते मुद्दे मांडले आहेत?
अमेरिकेन सर्वात महत्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीचा मुद्दा उपस्थित केला आहे. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिल्यास, त्या बदल्यात, तेहरानवरील सर्व निर्बंध उठवले जातील आणि बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्याला मदतही केली जाईल, असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे.
१५ मुद्द्यांपैकी महत्त्वाचे ५ मुद्दे पुढीलप्रमाणे
१) इराण समर्थन देणाऱ्या बंडखोरांना अप्रत्यक्ष रणनीती आणि या गटांना निधी व शस्त्रे पुरवणे थांबवावे.
२) नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणुसुविधा देखील इराणने बंद कराव्यात.
३) इराणच्या क्षेपणास्त्रांची संख्या, पल्ला आणि त्यांचा वापर मर्यादित करावा.
४) इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा.
५) होर्मुझ खुली केल्यास तेहरानवरील सर्व निर्बंध उठवले जातील आणि बुशेहर येथे नागरी अणुऊर्जा विकसित करण्यासाठी त्यांना मदतही केली जाईल.
असे १५ मुद्दे अमेरिकेने प्रस्तावात मांडल्याची माहिती समोर आली आहे.
इराणकडून युद्ध समाप्तीसाठी सात अटी
अमेरिकेने शस्त्रसंधीसाठी इराणसमोर १५ मुद्दे ठेवल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता इराणने देखील संघर्ष थांबविण्यासाठी सात अटी मांडल्याची माहिती समोर आली आहे.
१) आखाती देशातील अमेरिकेने सर्व तळ बंद करावेत.
२) इराणवर भविष्यात हल्ले होणार नाहीत याची ग्वाही द्यावी.
३) हिजबुल्लाहवरील इस्रायलचे हल्ले थांबवावेत.
४) समर्थक गटांवरील निर्बंध हटवावेत.
५) युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी.
६) इराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर निर्बंध घालू नयेत.
७) आणि होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांकडून कर आकारण्यास मुभा द्यावी.
अशा सात अटी इराणने ठेवल्याची माहिती समोर आली आहे.
शांतता चर्चेसाठी पाकिस्तानची मध्यस्थी
दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. यासाठी शाहबाज शरीफ यांनी एक पोस्ट देखील एक्सवरुन केली होती, त्याचा स्क्रिनशॉट खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरुन शेअर केला. आता या चर्चेतून दोन्ही देशांतील संघर्ष समाप्त होणार की दोन्ही देशांनी मांडलेल्या अटींवरुन या चर्चा फिसकटणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. शिवाय शांतता चर्चे यजमानपदी असणाऱ्या पाकिस्तानची यात काय भूमिका असेल याकडेही लक्ष लागले आहे.
३,००० अमेरिकी सैनिक युद्धभूमीवर उतरणार?
एकीकडे शांतता चर्चेची तयारी सुरु असताना अमेरिका मध्यपूर्वेत ३००० सैनिक पाठविण्याची तयारी करत आहे. अमेरिका एलिट ८२ एअरबोर्न विभागातील जवानांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाठविण्याची तयारीत आहे. बुधवारी पहाटे माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधातील युद्ध जिंकल्याच दावा केला. तसेच, इराणचे हवाई दल, नौदल, लष्कर उद्धवस्त झाल्याचे ते म्हणाले. तसेच, इराणने मोठी भेट देखील दिल्याचा दावा त्यांनी केला.
