USA Israel Vs Iran Conflict : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाला एक महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही हा संघर्ष थांबलेला नाही. या युद्धात इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. इराणधील काही दिग्गज नेत्यांसह अनेक लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तरीही इराणने या युद्धातून माघार घेतलेली नाही. सध्या एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणला दररोज धमकी देत आहेत. त्यामुळे हे युद्ध कधी थांबणार? की आणखी भडकणार? याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे.
यातच इराणने अमेरिकेचे दोन लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता इराणने इस्रायलच्या ड्रोन कारखान्यावर भीषण हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इस्रायलच्या पेटाह टिकवा येथील ड्रोन निर्मिती कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे या कारखान्याचं कामकाज पूर्णपणे बंद करावं लागलं असून या हल्ल्यामुळे इस्रायलच्या संरक्षण उत्पादनात मोठा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
वायनेट न्यूजच्या वृत्तानुसार, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नुकसान इतकं मोठं झालं आहे की त्या ठिकाणी पुन्हा काम सुरू करणं लवकर शक्य होणार नाही. सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. त्या ठिकाणी पुनर्बांधणी करता येण्याची शक्यता कमी आहे. कारखाना पूर्णपणे नष्ट झाला आहे. इस्रायलच्या या ड्रोन निर्मिती कारखान्याचं मोठं नुकसान झालं असून कारखान्याच्या परिसराजवळ मोठ-मोठे खड्डे पडले आहे.
हा हल्ला इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा एक भाग म्हणून पाहिला जात आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर या कारखान्याच्या सीईओंनी म्हटलं की, इराणने या कारखान्याला हेतुपुरस्सर लक्ष्य केलं असावं. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीमुळे हे ठिकाण ओळखता आलं असावं. या स्फोटामुळे इमारत उद्ध्वस्त झाली आणि मोठं नुकसान झालं. मात्र, अशा परिस्थितीतही काही महत्वाचा डेटा, उत्पादन आणि काही ड्रोन यशस्वीरित्या दुसरीकडे हवण्यात आले आहेत.
