Marco Rubio On Iran-US War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. या युद्धात काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला, तर आतापर्यंत शेकडो नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही हे युद्ध अद्याप थांबत नाहीये. अमेरिका-इस्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही प्रतिहल्ले करत असल्याने संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड होताच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

‘इराण जगाला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न करत आहे’, असं मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. तसेच इराणमध्ये एक दहशतवादी राजवट असल्याचा उल्लेख मार्को रुबियो यांनी केला आहे. तसेच अमेरिका-इस्रायलने केलेल्या कारवाईनंतर आता जग पूर्वीपेक्षा सुरक्षित आणि चांगलं होईल, असंही मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे.

‘जागतिक सुरक्षेसाठी इराणमधील लष्करी कारवाई आवश्यक’ : मार्को रुबियो

मार्को रुबियो यांनी म्हटलं की, “सध्याच्या लष्करी कारवाईचं उद्दिष्ट इराणची दहशतवादी कारवाया करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करणं हेच आहे. अमेरिका हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या मोहिमेचा उद्देश अशा कारवाया सुरू ठेवण्याची इराणची क्षमता नष्ट करणं आहे. आम्ही आमचं ध्येय साध्य करण्यासाठी रोज ताकदीने आणि अतिशय अचूकतेने पुढं जात आहोत. आमचं अभियान जसजसं पुढं जाईल तसतसं जग अधिक सुरक्षित होईल”, असं मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मार्को रुबियो यांनी इराणच्या सरकारचा दहशतवादी राजवट असा उल्लेख केला. तसेच दहशतवादाला चालना देण्यासाठी इराण राष्ट्र आणि राज्याच्या शक्तीचा वापर करत असल्याचा आरोपही रुबियो यांनी केला. मार्को रुबियो म्हणाले की, “इराण एकतर्फी हल्ल्यांसाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसारख्या शस्त्रांचा वापर करत आहे. ज्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. ही एक दहशतवादी राजवट आहे”, असं मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे.