US Israel – Iran War: अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीच्या माध्यमातून इराणची आर्थिक कोंडी केली आहे. या निर्बंधाच्या माध्यमातून अमेरिका इराणला प्रस्ताव मान्य करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण, इराण अमेरिकेच्या या दबावाला अद्याप जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. अमेरिकी नौदलाने गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांना होर्मुझमधील नाकेबंदीबाबत सविस्तर माहिती दिली. ४५ मिनिटांच्या या महत्वाच्या बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकीकडे ही बैठक होत असताना अमेरिकेने नुकताच सहा हजार टन लष्करी रसद इस्रायला पाठवली आहे. यामुळे अमेरिका पुन्हा एकदा इराणवर हल्ला करण्याची तयारी करत असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
दारुगोळा, युद्ध सामग्री इस्रायलमध्ये दाखल
इस्रायल टाईम्स आणि जेरुसलेम पोस्टने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. दोन कार्गो जहाज आणि काही विमानं जवळपास सहा हजार टन दारुगोळा आणि युद्ध सामग्री घेऊन इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये हवाई हल्ला आणि जमिनीवरुन हल्ला करण्यासाठी लागणारी क्षेपणास्त्र, मिलिटरी ट्रक, जॉईन्ट लाईट वाहनं आणि अतिरिक्त लष्करी वाहन अमेरिकेवरुन इस्रायलमध्ये दाखल झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, इराणविरुद्ध युद्ध सुरु झाल्यानंत अमेरिकेकडून इस्रायला एक लाख १५ हजार ६०० टन एवढे लष्करी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा प्राप्त झाला आहे.
पुन्हा लष्करी कारवाईची तयारी?
इस्रायलच्या संरक्षण मंत्रायलयाने प्रसिद्ध केलेल्या महितीनुसार, “इराणविरुद्ध ऑपरेशन रोअरिंग लायन सुरु केल्यानंतर इस्रायला एक लाख १५ हजार ६०० टन एवढे लष्करी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा प्राप्त झाला आहे. यामध्ये ४०३ हवाई वाहतुकीच्या माध्यमातून आणि १० समुद्रमार्गातून मदत प्राप्त झाले”, असे मंत्रायलयाने म्हटले आहे. अॅक्सिओसच्या वृत्तानुसार अमेरिका सध्या इराणविरुद्ध पुन्हा लष्करी कारवाई करण्याची तयारी करत आहे. यासाठी त्यांनी नव्याने प्लॅन तयार केल्याचे वृत्तात म्हटले आहे.
तीन पर्यायांवर चर्चा
अमेरिका इराणविरुद्ध नव्याने लष्करी कारवाई करत इराणमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. या हल्ल्यांच्या माध्यमातून इराणला पुन्हा एकदा चर्चेसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अॅक्सिओसच्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिका इराणविरुद्ध समोरासमोर संघर्ष करण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. याशिवाय विशेष फोर्सेसच्या माध्यमातून देखील कारवाई करण्याचा पर्याय अमेरिकेने खुला ठेवला आहे. इण्वस्त्र कार्यक्रम हे इराणविरुद्ध युद्ध सुरु करण्याचे एक मुख्य कारण आहे.
