अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये भीषण गोळीबार झाला असून, त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले. बफेलो येथील जेफरसन अव्हेन्यूजवळ गोळीबार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान हल्लेखोर पकडला गेला आहे. पोलीस आणि इतर आपत्कालीन सेवांनी या घटनेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आणि लोकांना येथे येण्याचे टाळण्यास सांगितले आहे.

बंदुकधारी हल्लेखोराने दुपारी बफेलो येथील एका सुपरमार्केटमध्ये अचानक लोकांवर गोळीबार केला, ज्यात सुमारे १० लोक ठार झाले आणि ३ लोक जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, टॉप फ्रेंडली सुपरमार्केटमध्ये अनेक लोक या गोळीबारात सापडले आहेत. सध्या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे.

सुपरमार्केटच्या बाहेर जमिनीवर पडले होते लोक

शनिवारी ही घटना घडली, जेव्हा अधिकाऱ्यांना १२७५ जेफरसन अव्हेन्यू येथील एका दुकानात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना सुपरमार्केटच्या बाहेर जमिनीवर पडलेले लोक दिसले.

बंदुकधारी सैनिकी वेशभूषेत

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंदुकधारी लष्करी वेशभूषेत होता. त्याच्या अंगावर ‘संरक्षण कवच’ही होते. जेव्हा तो त्याच्या वाहनातून बाहेर पडला तेव्हा तो सशस्त्र होता. त्याच्याकडे हेल्मेटही होते. त्याच्याकडे एक कॅमेरा होता ज्याद्वारे ही घटना लाईव्ह स्ट्रीम केली जात होती.

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

दुकानात मारल्या गेलेल्यांमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. तो येथे सशस्त्र सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर गोळीबार करणाऱ्याने त्याच्या मानेवर बंदूक ठेवली होती.