पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यामुळे पाकिस्तान हा देश दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा भारताच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. “माझ्या कारकिर्दीत ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहर याचा वापर भारतीय भूमीवर हल्ले करण्यासाठी करण्यात आला होता”, असे खुद्द मुशर्रफ यांनी मान्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली.
https://twitter.com/nadeemmalik/status/1102969913860386817
पाकिस्तानातील पत्रकार नदीम मलिक यांना फोनवरुन दिलेल्या मुलाखतीतून ही बाब समोर आली आहे. या मुलाखतीत बोलताना मुशर्रफ यांनी जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेविरोधात पाकिस्तान सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, “ही तीच संघटना आहे जिच्याकडून दोनदा माझ्या हत्येचा प्रयत्न झाला होता, जेव्हा मी पाकिस्तानचा अध्यक्ष होतो”. दोन मिनिटांच्या या मुलाखतीची ऑडिओ क्लिप मलिक यांनी ५ मार्च रोजी आपल्या ट्विटर हँडलवरुन प्रसिद्ध केली आहे. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
”जैश’विरोधात करण्यात आलेली कारवाई योग्य असून मी नेहमीच सांगत आलो आहे की, जैश-ए-महंम्मद ही दहशतवादी संघटना आहे. या संघटनेनेच आत्मघाती हल्ल्यांद्वारे माझ्या हत्येचाही कट रचला होता. त्यामुळे या संघटनेवर कारवाई करायलाच हवी. पाकिस्तानी सरकारने या संघटनेविरोधात कडक धोरण अवलंबल्याबद्दल मला आनंद होत आहे”, असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. तसेच दोनदा आपल्यावर झालेल्या हल्ल्यांचा तपशीलही त्यांनी या मुलाखतीत दिला आहे.
दरम्यान, तुमच्या हाती सत्ता असताना ‘जैश’च्या म्होरक्यावर कारवाई का केली नाही? या प्रश्नावर मुशर्रफ म्हणाले, त्यावेळची गोष्ट वेगळी होती कारण, त्यावेळी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ भारतावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी ‘जैश’चा वापर करीत होती. आयएसआयने भारताविरोधात त्यावेळी ‘जशास तशे’ धोरण अवलंबले होते. भारताकडून पाकिस्तानात हल्ले केले जात होते आणि त्यांना उत्तर देण्यासाठी आपण भारतात हल्ले घडवून आणत होतो. त्यामुळे आयएसआयने ‘जैश’वर कारवाई केली नाही आणि मी देखील कुठल्याही मोठ्या कारवाईचा आग्रह धरला नाही. या वक्तव्याद्वारे मात्र मुशर्रफ यांनी उलट्या बोंबा मारत नेहमीच शांततेची भुमिका पार पाडणाऱ्या भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला आहे.
मंगळवारी पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने दहशतवादी संघटनांशी संबधीत मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रौफ असगर आणि इतर ४३ दहशतवाद्यांविरोधात अटकेचे आदेश काढले होते. याचे मुशर्रफ यांनी स्वागत केले आहे.