पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात अपशब्द वापरणे काँग्रेससाठी नव्याने नित्य बाब (न्यू नॉर्मल) बनली आहे, अशी टीका भाजपने शनिवारी केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना रावणाची उपमा दिल्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे नेते व्ही. एस. युग्राप्पा यांनी मोदींवर टीका करताना त्यांना ‘भस्मासुर’ उपमा दिल्याच्या वृत्ताचा उल्लेख करून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही टीका केली.

काँग्रेसच्या बाबतीत ही नेहमीची बाब बनल्याची टीका करून पात्रा म्हणाले, की काँग्रेस हा शिवीगाळ-अपशब्द वापरणारा पक्ष बनला आहे. भारताने ‘जी-२०’ राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपण एक मित्र या नात्याने मोदींच्या पाठीशी उभे आहोत, या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या विधानाचा दाखला देत पात्रा म्हणाले, की एकीकडे जग मोदींच्या पाठीशी उभे आहे आणि दुसरीकडे काँग्रेस त्यांच्यासाठी अशी अपमानजनक भाषा वापरते. हे दु:खद व चिंताजनक आहे.

महाभारताचा उल्लेख करून पात्रा म्हणाले, की काँग्रेसने मोदींना उल्लेखून शंभर अपशब्द वापरले आहेत. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीत लोकशाही पद्धतीने मोदींसह जनता भगवान कृष्णासारखे सुदर्शन चक्राचा वापर करून लोकशाही पद्धतीने विरोधी पक्षांचा नायनाट करेल. या वेळी पात्रा यांनी मोदी सरकारच्या अनेक विकास व कल्याणकारी उपक्रम-योजनांचा उल्लेख करून, असा नेता ‘भस्मासुर’ असू शकत नाही, असे ठामपणे सांगितले.

भाजपकडून विधानाचा गैरवापर- खरगे
अहमदाबाद : ‘‘राजकारण हे व्यक्तिगत पद्धतीने करायचे नसते तर ते धोरणात्मक पद्धतीने करायचे असते. गुजरातमध्ये भाजप निवडणुकीतील फायद्यासाठी माझ्या वक्तव्याचा गैरवापर करत आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपमा रावणाशी केल्याबद्दल भाजपने खरगे यांच्यासह काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

या वादावर प्रथमच प्रतिक्रिया देताना खरगे म्हणाले, की काम उभे करणाऱ्या सकारात्मक राजकारणावर माझा विश्वास आहे. परंतु भाजपच्या राजकारणाच्या शैलीमध्ये लोकशाहीचा आत्मा नसतो, कारण ती केवळ ‘एकाच व्यक्ती’भोवती फिरते.आम आदमी पार्टी (आप) गुजरात निवडणुकीतील कामगिरीवर विचारले असता खरगे म्हणाले, की काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्यासाठी हा पक्ष कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Using abusive language against prime minister narendra modi is a new routine for congress amy
First published on: 04-12-2022 at 01:40 IST