अमेरिकेच्या नौदलाची विमानवाहू युद्धनौका युएसएस अब्राहम लिंकन थायलंडमधील पट्टाया शहराजवळ दाखल होण्यापूर्वी तेथील प्रशासनाने वेश्याव्यवसाय आणि त्यामागील नेटवर्कविरोधात कारवाई सुरू केलीय. ही युद्धनौका सलग २५० दिवस समुद्रात होती. इराणविरोधातील युद्धात अमेरिकेच्या लष्करी कारवाईत सहभागी असणारे सुमारे ५,००० अमेरिकन नौसैनिक, मरीन आणि वैमानिक २ ते ६ सप्टेंबरदरम्यान पट्टायाजवळ दाखल होणार आहेत.

थायलंडमध्ये वेश्याव्यवसायावर बंदी

थायलंडमध्ये कायद्यानुसार वेश्याव्यवसाय बेकायदेशीर आहे. वेश्यागृहे चालवणे आणि वेश्याव्यवसायातून आर्थिक फायदा मिळवण्यावर कायद्याने बंदी आहे. मात्र, प्रत्यक्षात पट्टायामध्ये हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. थाई माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार अब्राहम लिंकन दाखल होणार असल्याच्या प्रशासनाने वेश्याव्यवसायाच्या नेटवर्कविरोधात कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान वेश्यांसह सुमारे ५० जणांना शहरातील विविध भागांतून ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

५,००० अमेरिकी लष्करी जवान दाखल होणार

पट्टायामधील पर्यटन व्यवसाय मंदावलेला असतानाच ही कारवाई होत आहे. मध्यपूर्वेत युद्ध सुरू झाल्यानंतर शहराच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ५,००० अमेरिकी लष्करी जवानांच्या आगमनामुळे पर्यटन व्यवसायाला पुन्हा चालना मिळेल, अशी स्थानिक व्यावसायिकांना आशा आहे. अब्राहम लिंकन पट्टायाजवळील लाम चाबांग बंदरात थांबणार आहे. त्यामुळे तब्बल ५,००० नौसैनिक, मरीन आणि वैमानिकांना काही काळासाठी किनाऱ्यावर विश्रांती घेण्याची संधी मिळणार आहे.

सूचना काय आहेत?

समोर आलेल्या वृत्तांनुसार, अमेरिकी जवानांना अमली पदार्थांची दुकाने तसेच काही जलक्रीडा प्रकारांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना पट्टायातील रेड-लाइट परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वॉकिंग स्ट्रीटला भेट देण्याची परवानगी असेल. मात्र, रात्री २ वाजल्यानंतर बीअर बार किंवा इतर नाइटलाइफ ठिकाणी थांबू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकी जवानांना लैंगिक सेवा, विशेषतः बाल लैंगिक सेवा, पुरवू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे थाई पीबीएसने म्हटले आहे.

का होतेय कारवाई?

अमेरिकी जवानांकडून येणारा पैसा पट्टायातील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाच्या नेटवर्कमध्येही जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. द बँकॉक पोस्टने बँकॉक विद्यापीठाच्या पर्यटन व्यवस्थापन विभागाचे सहयोगी प्राध्यापक पिपाटपोंग फकफारे यांची याबाबत प्रतिक्रिया घेतली आहे. “मोठ्या संख्येने ग्राहक आल्यामुळे लैंगिक शोषणाचा धोका तसेच लैंगिक संक्रमित आजारांचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य आणि सुरक्षिततेसंदर्भातील धोके वाढू शकतात”, असे फकफारे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर पट्टाया पोलिसांनी शहरातील समुद्रकिनारा आणि नाइटलाइफ परिसरात गस्त वाढवली असून वेश्याव्यवसायाच्या नेटवर्कवर कारवाई सुरू केली आहे.