‘तो बलात्कार करत होता अन् त्याची बहीण करत होती चित्रीकरण’

१६ वर्षांच्या मुलीची पोलिसांकडे तक्रार

rape victim
प्रतिकात्मक छायाचित्र.

उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर २२ वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नराधम पीडितेवर बलात्कार करत असताना त्याची बहीण या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण करत होती, असा आरोप आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असली तरी पोलिसांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाला कौटुंबिक वादाची किनार असल्याचे स्पष्ट केले.

मुझफ्फरनगर येथे राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ‘समरीन नामक महिलेने मला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. मी नकार देताच समरीनच्या भावाने माझ्यावर बलात्कार केला. तर समरीनने या घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केले’ असे त्या मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे. वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच दोषींवर कठोर कारवाई करु, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

दोन कुटुंबातील वादातून ही बलात्काराची तक्रार दाखल झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. समरीनचा परिसरातील एका महिलेशी वाद आहे. या दोघींनी यापूर्वीही एकमेकींविरोधात पोलिसांकडे तक्रारी दिल्या आहेत.

शुक्रवारी समरीनने महिलेच्या कुटुंबीयांविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली होती. याचा बदला घेण्यासाठीच त्या महिलेने समरीन विरोधात तक्रार दाखल केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. एकीकडे देशात बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली जात असतानाच कायद्याचा असा गैरवापर करणाऱ्यांवर संताप व्यक्त होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uttar pradesh 22 year old man raped me his sister filmed act alleges 16 year old girl muzaffarnagar police