करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी मालमत्तेच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. जवळपास संपूर्ण देशात हीच परिस्थितीत आहे. परंतु अयोध्येत मात्र एका महिन्यात मालमत्तेचे दर दुप्पट झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. त्यानंतर या ठिकाणच्या मालमत्तेच्या दरात दुपटीनं वाढ झाली. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आलेल्या निकालानंतर या ठिकाणच्या मालमत्तांचे दर ३० ते ४० टक्क्यांनी वाढले होते. टाईम्स नाऊनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“अयोध्येमध्ये मालमत्तेचे दर १ हजार ते १ हजार ५०० रूपये प्रति चौरस फूट झाले आहेत. तर शहरामध्ये मालमत्तेचे दर २ हजार ते ३ हजार रूपये प्रति चौरस फूटांवर गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी या ठिकाणी ९०० रूपये प्रति चौरस फूट या दरात जमीन मिळत होती,” अशी माहिती मालमत्ता विषयक सल्लागार ऋषि टंडन यांनी दिली. ततर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ, थ्री स्टार हॉटेल आणि अनेक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर अचानक जमीन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. तर अनेक व्यावसायिक गुतवणूक आणि आपला प्रकल्प सुरू करण्यासाठी जमीन खरेदीसाठी येत आहेत.

अयोध्येत सर्वात चांगलं हॉलेट या ठिकाणाहून ६ किलोमीटर दूर आहे. परंतु सुविधांच्या कमतरतेमुळे शहराच्या बाहेर जमिनीचे दर ३०० ते ४५० रूपये प्रति चौरस फूट इतकेच होते. अयोध्येत काही प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारदेखील काही जमिनींचं अधिग्रहण करत आहे. अनेक जण यामुळेच जमिनी खरेदी करत असल्याचंही सांगण्यात येत आहे. परंतु जमिनी खरेदी करणाऱ्यांनी सरकारच्या विद्यमान दरानुसार जमिनी खरेदी केल्या नाहीत तर त्यांना मोठं नुकसानही सोसावं लागू शकतं.

“यामुळे आपल्याला आश्चर्य झालं आहे. अचानक संपूर्ण देशातून लोकं अयोध्येत आपल्याला अयोध्येत मालमत्ता खरेदी करण्यासाठी संपर्क करत आहेत. महमारीमुळे ज्या ठिकाणी मालमत्तांच्या दरात घसरण झाली आहे. तर दुसरीकडे अयोध्येत मात्र मालमत्तांचे दर वाढले आहेत,” असं दिल्लीतील एक मालमत्ता विक्रेते इम्रान यांनी सांगितलं.