भटक्या गायीला कारची धडक लागल्यानंतर संतप्त जमावाने ३६ वर्षीय सरकारी डॉक्टरला गाडीतून बाहेर खेचून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात ही घटना घडली आहे. धडकेत जखमी झालेल्या गायीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
उपचारासाठी जात असताना अपघात
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. राहुल सिद्धार्थ हे मुळचे बरेलीचे असून उसावन येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात प्रभारी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी ते आरोग्य केंद्रातून बदायूं बाजाराच्या दिशेने आपल्या महिंद्रा स्कॉर्पिओमधून जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाची रस्त्यावर असलेल्या भटक्या गायीला धडक बसली. अपघाताची माहिती मिळताच आसपासचे गावकरी घटनास्थळी जमा झाले.
संतप्त जमावाने डॉक्टरला केली मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर डॉक्टर आपल्या वाहनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गाय वाहनाजवळच पडल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. याचवेळी संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी डॉक्टरला गाडीतून बाहेर ओढले आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर हात जोडून जमावाकडे माफी मागताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र जमावाने त्यांना मारहाण सुरूच ठेवली.
गाडीचीही तोडफोड; गायीवर उपचार
जमावाने डॉक्टरच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. व्हिडिओमध्ये काही लोक दगड आणि काठ्यांनी गाडीच्या काचा फोडताना, तसेच वाहन उलटवण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिस्थितीची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि डॉक्टरला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले. अपघातात जखमी झालेल्या गायीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर तिला एका गोशाळेत हलवण्यात आले. मात्र काही वेळाने उपचारादरम्यान गायीचा मृत्यू झाला.
चार आरोपी अटकेत
बदायूं पोलीस अधीक्षक अंकिता शर्मा यांनी या प्रकरणात चार जणांना अटक केल्याची माहिती दिली. अलापूर पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर माधव सिंह बिस्ट यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले चारही आरोपी २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून ते बिचपुरी गावातील रहिवासी आहेत. ते विविध छोट्या-मोठ्या कामांतून उदरनिर्वाह करतात.
डॉक्टरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
डॉक्टरच्या तक्रारीवरून अलापूर पोलीस ठाण्यात सात व्यक्तींसह काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, दंगल, तोडफोड आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान केल्यासह विविध कलमांखाली कारवाई सुरू केली आहे.
डॉक्टरला गंभीर दुखापत नाही
मारहाणीनंतर डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या शरीरावर गंभीर स्वरूपाची दुखापत आढळली नाही. घटनेच्या तपासासाठी डॉक्टरची स्कॉर्पिओ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
