उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील एका मंदिरात दोन तरुणांची हत्या करून त्यांचे मृतदेह मंदिराच्या फरशीखाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मंदिरातील पुजारी मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांनी दावा केला जात असून त्याचा १४ वर्षीय मुलगाही फरार आहे. पोलिसांनी पुजाऱ्याच्या दोन शिष्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी दोन्ही तरुणांचे कुजलेले मृतदेह मंदिराच्या आवारात इंटरलॉकिंग फरशीच्या काही फूट खाली पुरलेल्या अवस्थेत सापडले. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
बहिणीबरोबरच्या संबंधांवरून होता वाद
२५ जुलै रोजी अंकित (२७) आणि त्याचा मित्र इसरार (३६) हे गावातील मंदिरात पुजाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. अंकितला पुजाऱ्याचे आपल्या लहान बहिणीबरोबर संबंध असल्याचा संशय होता. अंकितने यापूर्वीही पुजाऱ्याला हे संबंध संपवण्याचा इशारा दिला होता. मात्र २५ जुलै रोजी मंदिरात गेल्यानंतर अंकित आणि इसरार दोघेही घरी परतले नाहीत.
अंकित हा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग होता आणि जन्मापासून त्याच्या शरीराचा खालचा भाग काम करत नव्हता. इसरार हा त्याचा जवळचा मित्र होता आणि मोटारसायकलवरून त्याला ज्या ठिकाणी जायचे असायचे तिथे घेऊन जात असे.
चार दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार
दोघे घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांनी मंदिरातील पुजाऱ्याकडेही चौकशी केली; मात्र त्याला अंकित आणि इसरार यांच्याबद्दल काहीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. अखेर २९ जुलै रोजी दोन्ही कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच दोघांच्या मोबाईल फोनचे कॉल रेकॉर्ड आणि लोकेशन तपासले. पोलिसांना दोघेही गावाबाहेर गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले नाही. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशनही मंदिर परिसरातच आढळले.
मंदिरात अनेकदा झडती, मात्र काहीच हाती लागले नाही
पोलिसांनी मंदिर परिसरात अनेकदा तपासणी केली. मात्र सुरुवातीला दोन्ही तरुणांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी मंदिरातील लोकांकडून माहिती मिळवण्यासाठी खबऱ्यांची मदत घेतली. तपासादरम्यान पुजाऱ्याला दोन्ही तरुण बेपत्ता झाल्याबाबत माहिती असल्याचे पोलिसांना समजले.
चांदी नगर पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर राकेश कुमार पुंडीर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक बुधवारी रात्री मंदिरात पोहोचले. मात्र पोलिसांना पाहताच पुजारी आणि त्याचा १४ वर्षीय मुलगा तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. मंदिरात असलेल्या पुजाऱ्याच्या दोन शिष्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली.
फरशीखाली सापडले मृतदेह
पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान शिष्यांनी हत्येची माहिती दिली आणि दोन्ही मृतदेह कुठे पुरले आहेत त्याबद्दल माहिती दिली. शिष्यांनी दाखवलेल्या ठिकाणी पोलिसांनी खोदकाम केले. मंदिरातील इंटरलॉकिंग फरशी हटवल्यानंतर काही फूट जमिनीखाली अंकित आणि इसरार यांचे कुजलेले मृतदेह सापडले. यानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.
चहात गुंगीची औषधे मिसळल्याचा आरोप
पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही शिष्यांच्या साक्षीच्या आधारे हत्येची घटना समोर आणली आहे. अंकित पुजाऱ्यावर संतापलेला होता आणि त्याने आपली वागणूक सुधारावी अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पुजाऱ्याने दोन्ही तरुणांना शांत करण्याच्या बहाण्याने मंदिरातील एका खोलीत नेले. तिथे त्यांना गुंगीची औषधे मिसळलेला चहा देण्यात आल्याचा आरोप आहे. सुमारे तासाभरानंतर दोघेही झोपल्यानंतर पुजाऱ्याने त्यांना काही औषधांचे इंजेक्शन दिल्याचे शिष्यांनी पोलिसांना सांगितल्याचा दावा आहे.
मुलगा आणि शिष्यांच्या मदतीने मृतदेह पुरल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, त्यानंतर पुजाऱ्याने आपल्या मुलासह दोन शिष्यांच्या मदतीने मंदिराच्या फरशीखाली जमीन खोदली. दोन्ही तरुणांचे मृतदेह त्यात पुरल्यानंतर पुन्हा फरशी बसवण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी मृतदेह पुरले होते, त्याच ठिकाणी पुजारी नियमितपणे दिवे लावत असे जेणेकरून तेथील हालचालींबाबत कोणाला संशय येऊ नये.
पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा
या प्रकरणात पुजारी आणि त्याचा १४ वर्षीय मुलगा अद्याप फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, दोन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात येत असून, मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलीस अधिकारी राकेश कुमार पुंडीर यांनी सांगितले.
