उत्तर प्रदेशातील भदोही येथे एका २६ वर्षीय महिलेने तिच्या पती आणि सासूवर गंभीर आरोप केले आहेत. दोन महिन्यांची गर्भवती असताना पती आणि सासूने मारहाण केल्यामुळे आपला गर्भपात झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. एवढेच नाही, तर त्यानंतर तिला बेशुद्ध आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याच्या कडेला सोडून पती पळून गेल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासिदहा गावातील सपना सरोज हिचे फेब्रुवारी २०१७ मध्ये राकेश कुमार सरोज याच्याशी लग्न झाले होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. भदोहीचे पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी यांनी सांगितले की, सपनाचा गेल्या सुमारे पाच वर्षांपासून पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत होता. राकेशला तिच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणामुळे त्याने त्यांच्या दोन्ही मुलांना आपली मुले मानण्यासही नकार दिल्याचा आरोप सपनाने केला आहे. जून महिन्यात सपना तिसऱ्यांदा गर्भवती झाली. मात्र, तिच्या पतीने पोटातील मूल आपले नसल्याचे सांगून मूल स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप सपनाने केला आहे.
दोन महिन्यांची गर्भवती असताना मारहाण
१० ऑगस्टच्या रात्री राकेश आणि त्याची आई रीता देवी यांनी आपल्याला मारहाण केल्याचे सपनाने तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती. या मारहाणीत डोके, हात, पाय आणि कंबरेला गंभीर दुखापत झाल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिचा गर्भपात झाला आणि ती बेशुद्ध पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
सपनाच्या आरोपानुसार पतीने तिला पहाटे सुमारे ४ वाजता गोसाय बाजार परिसरातील रस्त्याच्या कडेला बेशुद्ध आणि रक्तबंबाळ अवस्थेत सोडले आणि तेथून तो पळून गेला. रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना ती आढळल्यानंतर त्यांनी तिच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी तिला उपचारासाठी भदोही जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
सपनाने तिचा दीर ब्रिजेश कुमार सरोज याच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने वारंवार दिल्याचे तिने म्हटले आहे.
पती, सासू आणि दीराविरोधात गुन्हा
सपनाने ११ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर गोपीगंज पोलीस ठाण्यात पती राकेश कुमार सरोज, सासू रीता देवी आणि दीर ब्रिजेश कुमार सरोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ८९ (स्त्रीच्या संमतीशिवाय गर्भपात घडवून आणणे), ८५ (पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून छळ), ३५१(३) (धमकी देणे), ३५२ (जाणीवपूर्वक अपमान आणि शांतात भंग करणे) आणि ११५(२) (जाणीवपूर्वक दुखापत करणे) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
