उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘अब्बाजान’ विधानावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष लालन सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, ‘‘हा देश सर्वांचा आहे, मग तो हिंदू असो की मुस्लीम, ख्रिस्ती किंवा अन्य कोणत्याही समाजाचा. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बोलताना संयम बाळगण्याची गरज आहे.’’

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे विश्वासू समजले जाणारे लालन सिंह म्हणाले की, आपल्या देशाबाबत विविधतेतील एकतेचा दाखला दिला जातो. देशाला हानी पोहोचवेल असे कोणतेही वक्तव्य कोणीही करू नये.

याचसंदर्भात त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमेत सोरेन यांच्यावरही टीका केली. सोरेन यांनी राज्यातील भोजपुरी आणि मागाही भाषिक लोकांबाबत हे कथित विधान केल्याचा आरोप आहे. प्रत्येकाला या देशाच्या आवडेल त्या भागात अधिवास करण्याचा अधिकार आहे, असे लालन सिंह म्हणाले.

कुशीनगरमध्ये रविवारी झालेल्या कार्यक्रमात आदित्यनाथ म्हणाले होते की, ‘‘लोकांना २०१७ च्या आधी शिधावाटप योजनेचा लाभ मिळत नव्हता, कारण त्या वेळी जे लोक अब्बाजान म्हणतात, तेच सगळे धान्य फस्त करीत असत. आता मात्र सर्वांना धान्य मिळत आहे.’’