लखनौतील खासगी शाळेत आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाला डेअरचे चॅलेंज महागात पडले आहे. तिसरीच्या मुलीशी असभ्य वर्तन करणाऱ्या मुलाचे शाळेतून निलंबन करण्यात आले आहे.

आठवीत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या वर्गमित्रांनी ‘डेअर’चे आव्हान दिले होते. ‘मुलींच्या स्वच्छतागृहात जाऊन कोणत्याही मुलीच्या टॉपची चेन उघडून ये’, असे त्याला सांगितले होते. यानंतर तो मुलगा मुलीच्या स्वच्छतागृहात गेला आणि तिथे तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीच्या ट्यूनिक टॉपची चेन उघडून पळाला.

घरी गेल्यावर मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आई- वडिलांनी शाळेत मुख्याध्यापकांचे कार्यालय गाठले. मुख्याध्यापकांनी मुलाच्या पालकांनाही बोलावले. मुलीच्या वडिलांनी संतापाच्या भरात मुलाच्या कानाखाली मारली. यावरुन दोघांच्या पालकांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे प्रकरण अलीगंज पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, तडजोडीनंतर मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केली नाही.

रविवारी शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित मुलाचे शाळेतून निलंबन केल्याची माहिती दिली. मात्र, यानंतरही मुलीचे आई- वडिल आक्रमक असून संतप्त पालकांनी रविवारी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्तेही सहभागी झाले.