उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दि. ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत म्यानमारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्यनाथांचा हा पहिलाच विदेश दौरा असेल. ‘अमर उजाला’ने दिलेल्या वृत्तानुसार योगी आदित्यनाथ ६ ऑगस्ट रोजी म्यानमार येथे आयोजित ‘वैश्विक शांतता आणि पर्यावरण’ या विषयावर आयोजित परिषदेत ते सहभागी होणार आहेत. विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनने याचे आयोजन केले आहे. ७ ऑगस्ट रोजी आदित्यनाथ भारतात परतणार आहेत. दि. ४ ऑगस्ट रोजी ते लखनऊवरून दिल्लीकडे रवाना होतील. गेल्या काही दिवसांपासून नेत्यांच्या विदेश दौऱ्यांचे वृत्त चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विदेश दौरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विदेश दौऱ्याची खिल्ली उडवण्यात आली होती.

पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाइटवर दि. २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासूनचा मोदींच्या विदेश दौऱ्याचा खर्च देण्यात आला आहे. पहिल्या वर्षी मोदींच्या विदेश दौऱ्यावर झालेला खर्च हा त्यांच्या तिसऱ्या वर्षीच्या खर्चापेक्षा अर्धा आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २०१४मध्ये पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यावर १३.४७ कोटी रूपये खर्च झाला होता. म्हणजे मोदींच्या कार्यकाळात तिसऱ्या वर्षांत त्यांच्या विदेश दौऱ्यावर सुमारे ६० कोटी रूपये खर्च झाले आहेत