अजब! हातात टोपली आणि डोक्यावर प्लास्टिक स्टूल घेऊन आंदोलकांशी भिडले; पोलिसांचे फोटो व्हायरल

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली दखल; कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई

UP Police, Uttar Pradesh Police, Unnao, Riot Control Gear
कायदा आणि सुव्यवस्था हाताळणाऱ्या पोलिसांकडे सामान्य सुविधादेखील नसल्याने उत्तर प्रदेश पोलिसांना टीकेचा सामना करावा लागला

उत्तर प्रदेशात हिंसक आंदोलकांना नियंत्रित करताना पोलिसांनी बचाव करण्यासाठी प्लास्टिक स्टूल आणि टोपलीचा वापर केल्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. उन्नावमध्ये घडलेल्या या घटनेची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून त्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाई केलेल्यांमध्ये एक एसएचओ आणि तीन इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लखनऊचे महानिरीक्षक लक्ष्मी सिंग यांनी व्हायरल झालेल्या फोटोंची दखल घेतली असून एसएचओ दिनेश मिश्रा आणि इतर तीन कर्मचाऱ्यांविरोधात हलगर्जीपणा, अक्षमता तसंत कर्तव्यापासून चुकल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास काय कारवाई केली जावी यासंबंधी सूचना आणि साहित्य सर्व जिल्ह्यांना पुरवण्यात आलं आहे. उन्नामध्ये गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिलेली असतानाही पोलीस सुसज्ज नव्हते ज्यासाठी पोलीस महासंचालकांनी पोलीस अधिक्षकांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. तसंच स्थानिक पातळीवर एसएचओवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे”.

आंदोलकांना सामोरं जाताना पोलिसांनी डोक्यावर स्टूल आणि हातात टोपली घेतल्याचे फोटो समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता. कायदा आणि सुव्यवस्था हाताळणाऱ्या पोलिसांकडे सामान्य सुविधादेखील नसल्याची टीका झाली होती. हे पोलीस उन्नाव येथे दगडफेक करणाऱ्या जमावाला सामोरे गेले होते.

यासंबंधी माहिती देताना उन्नावचे पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते अपघातात दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले होते. यावेळी काहीजण अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेण्याच्या बहाण्याने अपघातस्थळी नेले आणि रस्त्यावर ठेवले. यानंतर गावकरी तिथे पोहोचले आणि आंदोलन करण्यास सुरुवात केली. लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं असता त्यांनी नकार दिला आणि पोलिसांवर दगडफेक करत हिंसाचारास सुरुवात केली.

याप्रकरणी ४० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uttar pradesh cops use plastic stool wicker basket to control riotous mob in unnao sgy