उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सोमवारी बहराइचमध्ये हीरक जयंती समारंभादरम्यान उपस्थितांना संबोधित केलं. या दरम्यान त्यांनी मंचावरुन भारत माता की जय ही घोषणा करण्यास सांगितलं आणि या घोषणेमुळे भारतीय आणि पाकिस्तानी यांच्यातलं फरक कळतो असं विधानही केलं.

या कार्यक्रमादरम्यान बोलत असताना शर्मा यांनी केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारच्या कामाविषयीची माहितीही दिली आणि शेवटी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या आणि त्याविषयी काही विधानं केली. शर्मा म्हणाले की सर्वजण तीन वेळा भारत माता की जय ही घोषणा देतील आणि सर्वजण ही घोषणा आपली मूठ वळवून देतील. कोणीही ही घोषणा देताना पंजा दाखवणार नाही. कारण या पंज्यानेच या देशावर अनेक वर्षे राज्य केलं आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठला. आता आमच्या सरकारदरम्यान ना हिंदू-मुस्लिम दंगे होता, ना कोणती जातीय हिंसा होते.

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा पुढे म्हणाले, आता उच्चवर्णीय, मागासवर्गीय, अनुसुचित, अतिमागासवर्गीय हे सगळे एकत्र आले असून ते सर्व मिळून बजरंगबलीचा ठोसा झाले आहेत आणि जे लोक आपल्या देशाला आणि या भागाला वेगळं करु इच्छित आहेत, त्यांना चांगला धडा शिकवत आहेत. त्यामुळे आता भारत माता की जय म्हणताना हाताचा पंजा दाखवायचा नाही, तर बजरंगबलीचा ठोसा दाखवायचा. यावेळी बोलताना त्यांनी भारतीयत्वाची ओळख सांगणारा एक किस्साही ऐकवला. पोलिसांनी कशा प्रकारे भारत माता की जय ही घोषणा दिल्यामुळे भारतीय लोकांची ओळख पटवली होती, हेही त्यांनी सांगितलं.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ब्राम्हण संमेलनावरही जोरदार टीका केली. दिनेश शर्मा यांनी सांगितलं की, ब्राम्हण कोणतीही जात नसून तो एक संस्कार आहे. जीवन जगण्याची पद्धत आहे. त्यांना आपल्या पूर्वजांचा सन्मान व्हायला हवा आहे, देवी देवतांचा सन्मान होणं अपेक्षित आहे.