उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एकदा केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात केशव प्रसाद मौर्य यांनी मागील सरकारवर निशाणा साधताना योगींच्या काळात राज्यात लुंगीवाले आणि टोपीवाल्या गुंडांचे दिवस गेले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. मथुरा तयार आहे या ट्विटने वादाला तोंड फुटल्यानंतर लगेचच केशव प्रसाद मौर्य यांनी शुक्रवारी यांनी हे वक्तव्य केले आहे.

भाजपाची सत्ता येण्यापूर्वी लुंगीवाले गुंड राज्यात मुक्तपणे फिरत होते आणि जाळीदार टोपी घातलेले लोक व्यापाऱ्यांना धमकावत त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करायचे, असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे. शुक्रवारी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी प्रयागराजमध्ये भाजपाने आयोजित केलेल्या व्यापारी परिषदेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की “२०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रयागराजमध्ये लुंगीछाप गुंड फिरत होते. डोक्यावर जाळीदार टोप्या घालून आणि शस्त्रे घेऊन ते व्यापार्‍यांना धमकावण्याकरिता वापरत असत. जमिनीचा ताबा घ्यायचे आणि तक्रार न करण्याची धमके द्यायचे.”

“मात्र राज्यात भाजपाचे सरकार येताच टोपी आणि लुंगीच्या विळख्यातून व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. अन्यथा, सपा आणि बसपाच्या राजवटीत टोप्या आणि लुंगी घातलेले गुंड व्यापाऱ्यांना धमकावायचे आणि खंडणी वसूल करायचे. आज हे सर्व नाहीसे झाले आहे, कारण भाजपाने टोपी आणि लुंगीछाप गुंडांची दहशत संपवली आहे. व्यापारी व उद्योगपती यांचे उज्ज्वल भवितव्य भाजपाच्या पाठीशी असून व्यावसायिकांच्या बळावर भारतीय जनता पक्षाने २०१४ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकल्या आहेत,” असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा २०२२ च्या निवडणुकीसाठी सपा, बसपा आणि भाजपा जोरदार प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपा पूर्ण आत्मविश्वासात आहे. यावेळी निवडणुकीत ३०० हून अधिक जागा जिंकून २०२२ मध्ये पुन्हा एकदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करेल असा भाजपाचा दावा आहे. भाजपाने प्रयागराजमध्ये मंडलस्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, फतेहपूर येथील व्यापारी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनीही समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, अखिलेश यादव सांगत आहेत की त्यांचे सरकार आले तर बुलडोझर परत करू. त्यामुळे भाजपाची सत्ता आली नाही तर काय होईल हे लोकांना चांगले समजू शकते. आम्ही माफिया आणि डॉन लोकांवरच बुलडोझर चालवला आहे.