Haryanvi singer Ankit Baliyan murder: हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बालियान याची उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जिममधून बाहेर पडत असताना दोन दुचाकींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात बालियानचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. बालियान नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम केल्यानंतर बाहेर पडत होता. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून दुचाकींवरून पसार झाले. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

१५ ते २० वेळा झाडल्या गोळ्या

जिमचे मालक रवी शर्मा यांनी एएनआयला सांगितले की, बालियान दररोज जिममध्ये येत होता. बुधवारी संध्याकाळी सुमारे साडेसहा ते पावणेसात वाजता तो व्यायाम करून बाहेर पडत असताना काही जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी अंदाजे १५ ते २० वेळा गोळीबार केला. बालियानला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शामलीचे पोलिस अधीक्षक एनपी सिंह यांनी सांगितले की, हत्येमागील कारण शोधण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे.

कुटुंबीय आणि समर्थकांचा रास्ता रोको

बालियानच्या हत्येची बातमी पसरताच त्याचे कुटुंबीय आणि समर्थक रस्त्यावर उतरले. त्यांनी घटनास्थळापासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या वर्मा मार्केट तिराहाजवळ दिल्ली-मुझफ्फरनगर रस्ता रोखून धरला. हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

अखिलेश यादवांकडून राजकीय कटाच्या शक्यतेचा उल्लेख

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बालियानच्या हत्येचा निषेध केला. तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ‘शून्यावर’ आली असल्याचे म्हटले आणि यामागे काही राजकीय वैर असू शकते का, याची चौकशी करण्याची मागणी केली. बालियानच्या हत्येनंतर जाट समाजातही संताप असून हल्लेखोरांच्या अटकेची मागणी होत असल्याचे यादव यांनी म्हटले.

पंचायत निवडणूक लढवण्याची चर्चा

बालियान आगामी पंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र त्याने निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली होती किंवा त्याच्या हत्येचा निवडणुकीशी संबंध आहे, याची पुष्टी अद्याप पोलिसांकडून दिली गेली नाही.

यूट्यूबवर साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स

बालियानच्या यूट्यूब चॅनेलवर साडेतीन लाखांहून अधिक सदस्य होते. हरियाणवी गाणी आणि परफॉर्मन्समुळे त्याने मोठा चाहतावर्ग निर्माण केला होता. त्याच्या अनेक व्हिडिओंमध्ये बंदुका, शस्त्रे आणि एसयूव्ही गाड्यांचे चित्रण पाहायला मिळत असे.

तो शामलीतील बंटिखेडा गावचा रहिवासी होता. २०२३ मध्ये परवानगीशिवाय रोड शो केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरोधात शामलीमध्ये एफआयआर ही दाखल करण्यात आली होती.