कर्नाटकमधील भाजप सरकार विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात धर्मांतर प्रतिबंधक विधेयक आणण्याच्या तयारीत असतानाच; ‘लव्ह जिहाद’ला प्रतिबंध करणारा कायदाही येत्या काही दिवसांत आणला जाईल, असे राज्याचे ऊर्जामंत्री व्ही. सुनील कुमार यांनी सोमवारी सांगितले.

मुस्लीम युवकांनी प्रेमाच्या नावाखाली हिंदू मुलींना धर्मांतरासाठी बळजबरी करण्याच्या कथित मोहिमेचा उल्लेख हिंदुत्ववादी संघटना ‘लव्ह जिहाद’ असा करत असतात.

‘आम्ही धर्मांतर करत नाही आणि आमचा तो हेतू नाही असा दावा काही संघटना जाहीररीत्या करतात. मग त्यांचा धर्मांतर प्रतिबंधक कायद्याला विरोध का करतात? एका बाजूला ते आपण अशा गोष्टी करत नसल्याचे म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला ते विधेयकाला विरोध करतात. त्यामुळे त्यांच्या विधानात संदिग्धता आहे, आमच्या नाही’, असे कुमार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

‘भाजप सरकार गोहत्या प्रतिबंधक कायदा आणि धर्मांतर प्रतिबंधक कायदा आणेल असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलेलो असून आम्ही त्याच्याशी बांधील आहोत. याच्या एक पाऊल पुढे जाऊन, आम्ही लव्ह जिहादविरोधी कायदा आणू असे मी सांगतो’, असे कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त पत्रकारांशी बोलताना कुमार म्हणाले.

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याच्या संदर्भात उत्तर प्रदेशात काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबत माहिती मिळवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे सरकारने या वर्षीच्या सुरुवातीला सांगितले होते.