Nepal Flood Gandak River Dead Bodies: नेपाळमध्ये विनाशकारी महापुराचे भीषण पडसाद आता उत्तर प्रदेशातही उमटू लागले आहेत. नेपाळमधून वाहत येणाऱ्या गंडक नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांत तब्बल १० मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांच्या हद्दीत हे मृतदेह सापडले असून, अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. नेपाळमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही शोध आणि बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत मृतांचा एकूण आकडा ६२६ वर पोहोचला आहे.
नेपाळमध्ये उगम पावणारी गंडक नदी पुढे उत्तर प्रदेशात प्रवेश करते. प्रशासनाच्या माहितीनुसार, सापडलेले सर्व मृतदेह प्रौढांचे असून ते नेपाळी नागरिक असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. सध्या हे सर्व मृतदेह महाराजगंज आणि कुशीनगर येथील शवागारात ठेवण्यात आले असून, नियमांनुसार पुढील ७२ तास ते तिथे ठेवले जातील.
ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू
मृतांच्या अंगावरील दागिने, वस्तू, गोंदलेले टॅटू आणि विशिष्ट शारीरिक खुणांची नोंद प्रशासनाने घेतली आहे. तसेच परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये आणि सीमावर्ती भागात मृतांचे फोटो पाठवण्यात आले आहेत.
महाराजगंजचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जिल्ह्याच्या हद्दीत चार मृतदेह (तीन महिला आणि एक तरुण) सापडले आहेत. पुढील ७२ तासांत कुणीही दावेदार समोर न आल्यास सरकारी नियमांनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.” या घटनेचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला असून, पुढील कार्यवाहीसाठी तो केंद्र सरकारकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.
कुशीनगरमधील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ रवी प्रताप राय यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यक्षेत्रात ३ पुरुष आणि ३ महिलांचे असे एकूण सहा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या महाराजगंज आणि कुशीनगरच्या पूरग्रस्त भागात ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’ आणि पीएसीचे पथक स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने बचावकार्यात तैनात आहेत.
घरगुती साहित्य आणि वाहनेही वाहून आली
नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्यामुळे पुराचा तात्काळ धोका टळला असला, तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. महापुराच्या प्रवाहाबरोबर मृतदेहांव्यतिरिक्त वाहने, घरगुती साहित्य, गॅस सिलिंडर, ड्रम, लाकडी ओंडके आणि फर्निचर असा मोठा ढिगारा गंडक नदीतून वाहत आला आहे.
नदीकाठी वाहून आलेले साहित्य गोळा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ गर्दी करत आहेत. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
