उत्तर प्रदेशातील बहुचर्चित ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाच्या खटल्यात मेरठ जिल्हा न्यायालयाने मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना सौरभ राजपूत यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे. तब्बल १३ महिने आणि १२६ सुनावण्यांनंतर बुधवारी या खटल्यातील सुनावणी पूर्ण झाली. जिल्हा सरकारी वकील कृष्ण कुमार चौबे यांनी सांगितलं की, न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेत दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं. मात्र, त्यांना कोणती शिक्षा सुनावली जाणार, याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
लंडनहून सुट्टीसाठी आलेल्या पतीची हत्या
२६ वर्षीय सौरभ राजपूत हे लंडनमध्ये काम करत होते. गेल्या वर्षी सुट्टीसाठी ते मेरठमधील घरी आले होते. तपास यंत्रणांच्या आरोपानुसार, याच काळात त्यांची पत्नी मुस्कान आणि साहिल यांनी मिळून त्यांची हत्या केली. पोलिसांच्या तपासानुसार, ४ मार्च रोजी मुस्कानने सौरभ यांच्या जेवणात कथितरीत्या गुंगीचं औषध मिसळलं. सौरभ बेशुद्ध झाल्यानंतर मुस्कान आणि साहिल यांनी त्यांच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते सिमेंटच्या टाकीत टाकल्याचा तपास अधिकाऱ्यांचा आरोप आहे.
हत्येनंतर दोघेही शिमल्याला पळाले
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी मुस्कान आणि साहिल शिमल्याला गेले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणाने गेल्या वर्षी देशभरात मोठी चर्चा निर्माण केली होती. मृतदेह सिमेंटच्या टाकीत ठेवण्यात आल्याच्या तपशीलामुळे या प्रकरणाला ‘ब्लू ड्रम मर्डर केस’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
सौरभच्या कुटुंबीयांची फाशीच्या शिक्षेची मागणी
निकालाच्या वेळी सौरभचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. दोन्ही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सौरभची आई रेणू राजपूत यांनी म्हटलं की, “न्यायालयाने मुस्कानला दोषी ठरवलं असलं तरी तिच्याकडे आपला एक प्रश्न आहे, तिने माझ्या मुलाची हत्या का केली?”
रेणू यांच्या म्हणण्यानुसार, मुस्कानने सौरभसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दोघांचं लग्न करण्यात आलं होतं. नंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर घटस्फोटाचा खटला सुरू होता. त्यामुळे वेगळं होण्याचा मार्ग उपलब्ध असताना हत्या करण्याची गरज काय होती, असा सवाल त्यांनी केला.
तुरुंगात मुस्कानने दिला मुलीला जन्म
या प्रकरणातील आरोपी मुस्कानने २४ नोव्हेंबर रोजी तुरुंगात एका मुलीला जन्म दिला. सध्या ती मेरठमधील चौधरी चरण सिंह जिल्हा कारागृहाच्या बॅरेक २ बीमध्ये बंद आहे. तिच्यासोबत इतर महिला आरोपीही आहेत.
निकालापूर्वी दोन्ही आरोपींच्या वर्तनात बदल
निकालाच्या काही तास आधी मेरठ जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. वीरेश राज यांनी दोन्ही आरोपींच्या वर्तनात बदल झाल्याचं सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, साहिल गेल्या चार दिवसांपासून शांत होता. तो इतर कैद्यांशी फारसा संवाद साधत नव्हता. तर निकालाच्या आधीच्या तीन दिवसांत दोन्ही आरोपी बराच वेळ प्रार्थना करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आता न्यायालयाकडून दोन्ही दोषींना कोणती शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
