Mirzapur Train Accident : उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरच्या चुनार रेल्वे स्टेशनवर एक भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवाशी रेल्वे स्टेशनवरून रेल्वे रुळ ओलांडत होते. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूकडून आलेल्या रेल्वेने जोराची धडक दिल्यामुळे सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे.
या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ९.१५ वाजता प्रयागराज एक्सप्रेसमधून काही प्रवाशी खाली उतरले होते आणि दुसऱ्या बाजूने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. पण याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून जाणाऱ्या कालका एक्सप्रेसने वेगात धडक दिली. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं.
या घटनेतील मृतांमध्ये काही भाविक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप सर्व मृतांची ओळख पटलेली नाही. ही घटना अतिशय भयानक असल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. ही घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ घटनेची माहिती घेत मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Indian Railways says, "Train no 13309 (Chopan – Prayagraj Express) arrived at Chunar Station Platform 4 (in Uttar Pradesh). Some passengers got down on the wrong side and were trespassing from the main line while Foot Over Bridge is available. Train no 12311 (Netaji Express) was…
— ANI (@ANI) November 5, 2025
तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या आणि बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बरोबरच मुख्यमंत्र्यांनी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांसह स्थानिक अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देत मदतकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
बिलासपूरमध्येही घडली होती रेल्वे अपघाताची घटना
छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात नुकतीच भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली होती. त्यामुळे हावडा-मुंबई आणि हावडा-अहमदाबाद या दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करावा लागला होता.
ही दुर्घटना बिलासपूर–कटनी रेल्वे विभागातील लाल खदान परिसरात दुपारी साधारण चारच्या सुमारास घडली होती. कोरोबा पॅसेंजर (क्रमांक ६८७३३) आणि एका मालगाडीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत पॅसेंजर गाडीचे काही डबे रुळांवरून घसरले. अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून, दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाले होते.
धडकेनंतर रेल्वेच्या ओव्हरहेड वायर्स, सिग्नल प्रणाली आणि रुळांचे मोठे नुकसान झालं होतं. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही तासांसाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या बचाव आणि दुरुस्ती पथकांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन सेवा यंत्रणांनी बचावकार्य केलं होतं.
