गाडी खराब होईल म्हणून जखमींना रुग्णालयात नेण्यास पोलिसांचा नकार, दोघांचा मृत्यू

रक्ताने गाडी खराब होईल म्हणून दिला नकार

मृत सन्नी आणि अर्पित (फोटो: 'एनबीटी डॉट कॉम'वरून)

उत्तर प्रदेश पोलिसांचा अमानुष चेहरा एका नवीन प्रकारामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. गुरुवारी (१८ जानेवारी २०१८) रोजी एका रस्ते अपघातामध्ये जखमी झालेली दोन अल्पवयीन मुले पोलिसांसमोर रस्त्यावर तडफडून मेली तरी पोलिसांनी काहीच केले नाही. अपघातात जखमी झालेल्या मुलांना पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात घेऊन गेल्यास रक्ताने गाडी खराब होईल हे कारण देत पोलिसांनी मदत नाकारली. या प्रकरणाचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

उपस्थित लोकांना लाख विनंत्या केल्यानंतरही पोलिसांनी या जखमी मुलांना आपल्या गाडीतून रुग्णालयात नेण्यास नकार दिल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या गाडीने या मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या मुलांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ उपस्थितांनी तयार केला असून आज सकाळपासूनच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तीन मिनीट १८ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये सहारनपूर जिल्ह्यातील हा सर्व प्रकार उपस्थितांनी रेकॉर्ड केला आहे.

नुमाइश कॅम्प सेतिया विहार येथे राहणारे अर्पित खुराना (वय १७) आणि सन्नी (वय १७) हे आपल्या मोटरसायकलवरून स्वत:च्या घरी जात होते. त्यावेळी बेरीबाग परिसरामध्ये मंगळनगर चौकात गाडीवर नियंत्रण सुटल्याने गाडी एका खांबाला आदळली आणि हे दोघे गाडीसहीत जवळच्या नाल्यात पडले. खांबाला गाडीने दिलेली ही धडक इतकी जोरात होती की मोठा आवाज झाल्याने स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले.

स्थानिकांनी दोन्ही जखमी मुलांना नाल्यातून बाहेर काढले त्यावेळी त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. गर्दीमधील कोणीतरी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. काही वेळातच पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र त्यांनी या जखमी मुलांना रुग्णालयात नेण्याससाठी नकार दिला. या व्हिडीओमध्ये स्थानिक लोक अगदी रडक्या स्वरात पोलिसांना या जखमी मुलांना उचलून रुग्णालयात नेण्याची विनंती करताना दिसत आहेत. पोलिसांना सर, साहेब अशा अनेक नावांनी विनंती करताना एकजण या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. मात्र पोलिस केवळ तिथे उभे असून जखमी मुले रस्त्यावर तडफडतानाही या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

दुसऱ्यांनी मदत केली तर…

अखेर पोलिसांच्या आडमुठेपणाला कंटाळून एका तरुणाने जखमींना उचलून आपल्या गाडीने रुग्णालयात नेण्याची तयारी दाखवली आणि पोलिसांना गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यावेळी हे पोलिसवाले त्या मदत करणाऱ्याला गाडी खराब होईल तुझी असे सांगाताना दिसत आहेस. जर या जखमींना गाडीत बसवलेस तर गाडी खराब होईल आणि तुला संपूर्ण रात्र घाणेरड्या गाडीतच काढावी लागेल अशा प्रकारची पोलिसांची संवेदनशून्य वक्तव्येही या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहेत. या जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी एकादा टॅम्पो शोधा आम्ही त्यांना आमच्या सरकारी गाडीने नेणार नाही असा माज हे पोलिस दाखवत असल्याचे या व्हिडीओ दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता शहर पोलीस अधीक्षक प्रबल सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uttar pradesh police refuse to take the injured in police car as car will get dirty by blood spots of injured 2 minor dies